अमळनेर : अतिक्रमित टपरी राहू देण्याच्या कारणावरून दोघा भावांनी शासकीय कामात अडथळा आणून नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना १८ रोजी दुपारी १२ वाजता कोंबडी बाजार भागात घडली.
नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख राधेश्याम अग्रवाल हे कोंबडी बाजार भागात नगरपालिकेच्या रस्त्याचे काम सुरू होते म्हणून हजर होते. त्यावेळी तेथे जितेंद्र रंजन साळुंखे व दशरथ रंजन साळुंके रा गुरुकृपा कॉलनी हे दोघे भाऊ आले आणि त्यांनी सांगितले की आमची टपरी अतिक्रमित आहे. रस्त्याच्या कामामुळे ती काढली जाईल तरी ती काढू नका. त्यावेळी अग्रवाल यांनी सांगितले की ते माझ्या हातात नाही मुख्याधिकारी जे काम सांगतात ते मी करतो. वाटल्यास तुम्ही त्यांना भेटा. याचा राग येऊन दोघा भावानी अग्रवाल याला चापट बुक्क्यांनी मारून शासकीय कामात अडथळा आणला. इतर कर्मचाऱ्यांनी आवरा आवर केल्यावर अग्रवाल याना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले.अमळनेर पोलीस स्टेशन ला फिर्याद दाखल केल्यावरून दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल नाना पवार करीत आहेत.