पूर्व तयारीसाठी प्रताप तत्वज्ञान केंद्रात कार्यशाळा संपन्न…
अमळनेर:- येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी दि. १ फेब्रुवारी रोजी कलानंद बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. बालमेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी प्रताप तत्वज्ञान केंद्रात कार्यशाळा पार पडली. बाल मेळाव्याची जबाबदारी ज्या विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्या मुला-मुलींसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
दि. १ फेब्रुवारीला बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बाल मेळाव्याचे उद्घाटन रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थीनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. तर बाल स्वागताध्यक्षपद डि.आर. कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थीनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदि कलाविष्कार सादर करणार आहेत.
बालमेळाव्यासाठी मंच व्यवस्थापन, कथाकथन, काव्यवाचन नाट्यप्रवेश आदींसाठी निवड झालेल्या मुलामुलींसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्याची कशी तयारी झाली आहे? काय बदल केला पाहिजे? याबाबत बाल मेळावा समितीचे सदस्य संदीप घोरपडे, प्रा.प्रकाश धर्माधिकारी, गिरीश चौक, वसुंधरा लांडगे, मिलिंद पाटील, भाऊसाहेब देशमुख, ॲड. सारांश सोनार, ॲड. कौस्तुभ पाटील, प्रा.पी.जे.जोशी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. भैय्यासाहेब मगर यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहा एकतारे यांनी आभार मानले. म.वा. मंडळातर्फे प्रा.शीला पाटील यावेळी उपस्थित होत्या.