अमळनेर : विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त मतदान हिंगोणे सीम प्रगणे जळोद येथे ८९.५८ टक्के झाले. तर सर्वात कमी मतदान बूथ क्रमांक १७६ वर फक्त ४०.८७ टक्के झाले आहे.
विधानसभा मतदार संघात १ लाख ५७ हजार ८०५ मतदारांपैकी १ लाख ४ हजार ६६ पुरुष मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ६५.९५ टक्के आहे. तर १ लाख ५० हजार ४६४ महिलांपैकी ९८ हजार १८० महिलांनी मतदान केले असून टक्केवारी ६५.२५ टक्के आहे. यंदा लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या बरोबर आहे.
ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी जास्त असून शहरातील काही भाग सोडले तर शहरात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. डॉ अनिल शिंदे यांच्या पिळोदे येथे ६७.९६ टक्के मतदान झाले. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या राजवड गावाला ६९.९० टक्के मतदान झाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी यांच्या खवशी गावाला ७०.६९ टक्के मतदान झाले. शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील यांच्या मंगरूळ गावाला ६७.०८ टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या तिलोत्तमा पाटील , किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील , पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे यांच्या शिरूड गावाला ६५.६६ टक्के मतदान झाले. ऍड ललिता पाटील व गणेश भामरे यांच्या बाम्हणे गावाला ७५.९८ टक्के मतदान झाले. माजी आमदार डॉ बी एस पाटील व बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल पाटील यांच्या मालपूर गावाला ७३.८५ टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या रंजाणे गावाला ७२.५९ टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान झालेले गाव मंत्री अनिल पाटील यांचे आहे. तर सर्वात कमी मतदान झालेला अमळनेर शहराचा प्रभाग हा देखील मंत्री अनिल पाटील आणि उमेदवार डॉ अनिल शिंदे राहत असलेला प्रभाग आहे.