सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी , आधी मोजणार टपाली मतदान
अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण त्या त्या गावाला झाले असले तरी त्यांची नियुक्ती लकी ड्रॉ पद्धतीने होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ईव्हीएम साठी १४ टेबल , पोस्टल मतदानासाठी ६ आणि इटीपिबीएस साठी ३ टेबल असणार आहेत.
मतमोजणीत पारदर्शीपणा असावा, ओळखिचे कर्मचारी म्हणून संशय नको यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कर्मचार्यांना यादृच्छिक पद्धतीने कोणत्याही मतदार संघात मोजणीसाठी जावे लागणार आहे. प्रथमच हा प्रयोग राबवण्यात येत आहे.
अमळनेर विधानसभेचे ईव्हीएम मशीन टाकरखेडा रस्त्यावरील गोदामात त्रिस्तरीय सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत. त्यात पहिला स्तर केंद्रीय सुरक्षा बल ६० कर्मचारी , दुसरा स्तर राज्य सुरक्षा बल २४ कर्मचारी आणि तिसरा स्थानिक पोलिसांचा आहे. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींसाठी सीसीटीव्हीचे थेट प्रक्षेपण सुरू आहे.
मतमोजणी साठी प्रत्येक टेबलवर एक अधिकारी एक सहायक व एक शिपाई असणार आहे. एकूण २४ फेऱ्या होणार आहेत. दुपारी १ पर्यंत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. मतदानाच्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून १२ अधिकारी आणि ११० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.