अमळनेर– तिसरे अपत्य असल्याची माहीती लपवून पूज्य सानेगुरुजी नगरपालिका कर्मचारी पतपेढीत राखीव जागेतुन उमेदवारी करणाऱ्या आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण यांचे विरुध्द खटला चालविण्यात यावा असा निर्णय अमळनेर न्यायालयाने दिला आहे.
अमळनेर नगरपालिकेच्या सेवेत असलेले तत्कालीन आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण यांनी पूज्य सानेगुरुजी नगरपालिका वरिष्ठ कर्मचाऱ्यांची पतपेढी मधील संचालक पदासाठी अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नामनिर्देशन पत्र भरतांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १९६० मधील कलम ७३(क), (अ) मध्ये नमुद कोणतीही अपात्रता धरण करीत नसल्याचे खोटे व दिशाभुल करणारे कथन करुन त्याच्या सन २००५ नंतर जन्मलेल्या तिसऱ्या
अपत्याची माहीती लपवून ठेवली होती. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे प्रतिस्पर्धी उमेदवार रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी तक्रार दिल्यानंतर आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांना अपात्र घोषित करण्यात आले. मात्र खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी चव्हाण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रघुनाथ मोरे यांनी सहाय्यक निबंधक अमळनेर व अमळनेर पोलीस, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती परंतु संबंधितांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने मोरे यांनी अमळनेरन्यायालयात युवराज श्रीपत चव्हाण यांचेविरुध्द खटला दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयासमोर सविस्तर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण यांनी उमेदवारी अर्जात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम १६६, १६७,१७७,१८१,१९३, १९९, २०० अंतर्गत प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग -१ न्यायमूर्ती एस.एस. जोंधळे यांनी सदर खटल्याची दखल घेवून आरोग्य निरीक्षक चव्हाण यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले आहे.या प्रकरणी फिर्यादी रघुनाथ रामभाऊ मोरे यांच्या वतीने ऍड.रणजीत बिऱ्हाडे हे काम पाहत आहेत.