उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईचा चटका बसणार…
अमळनेर:- शहराला मार्च अखेरपर्यंत पुरवठा होईल इतपत पाणी तापी नदीतील डोहात शिल्लक आहे. यामुळे अमळनेरकरांचे पाण्याचे वेळापत्रक बदलले असून तापीत पाण्याचा ठणठणाट सुरु झाला असून मार्च अखेरीसच पाण्याचा साठा संपेल. इतकेच पाणी आता तापी नदीपात्रात जळोद इंटेकवेल जवळ पाणी आहे, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे यांनी दिली.
पालिकेची इंटकवेल तापी नदीत आहे. त्याजवळ पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठा कमी झाला असून जळोद येथे पाणीपुरवठा योजनेची इंटेकवेल आहे. परंतु आता पाण्याची पातळी खालावली असून या विहीरीजवळ जोपर्यंत पाणी साठा असतो तोपर्यंत पाणी पुरवठ्यास अडचण येत नाही. त्यानंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल अशी स्थिती होणार आहे. साहित्य संमेलनामुळे सहा दिवस झाले तरीही पाणी नागरिकांना आलेले नाही. अजूनही सातव्या दिवशी पाणी येईल की नाही याची खात्री नाही. संभाव्य टंचाई पाहून पालिकेने कलाली येथील डोहातून पाणी सुरू केले असले तरी त्यातून अल्प पाणीपुरवठा मदत करणार आहे. जळोद येथील दोन पंपापैकी एक पातळी खालावल्याने बंद करण्यात आला आहे. मात्र गंगापुरी डोहातून अद्याप चारी खोदून पाणी आणले गेले नाही. ते पालिकेने आणावे अशी मागणी होत आहे.
पाणी जपून वापरा…
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. आता पाण्याचे बाष्पीभवन अधिक होते. यामुळे भविष्यात पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाणी जपून वापरा अन्यथा उधळपट्टी करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– प्रवीण बैसाने, पाणीपुरवठा अभियंता