अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन तालुक्यातील आटाळे येथे करण्यात आले. भारतीय सैन्य दलात सेवा बजावलेले माजी सैनिक अनिल भाऊराव बाविस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डी डी पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, आटाळे गावच्या सरपंच रत्नाबाई पाटील, उपसरपंच सोनाली मिस्तरी , माजी कृउब संचालक प्रकाश पाटील, उपप्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, ग्रामसेवक विवेक सूर्यवंशी व मुख्याध्यापक योगेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. “सक्षम युवा समर्थ भारत” या विषयावर आधारित हे विशेष श्रम संस्कार शिबिर दिनांक 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान जि. प. शाळा आटाळेच्या प्रांगणात होणार असून यादरम्यान श्रमसंस्काराबरोबरच बौद्धिक व्याख्यानांचे देखील आयोजन करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकातून रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा महादेव तोंडे यांनी सांगितले. तर हे शिबिर म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्यक्ष जीवनाचा एक अविस्मरणीय अनुभव असून या अनुभवातून व्यक्तिमत्व विकास होतो, असे मत प्राचार्य डॉ अनिल पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या अध्यक्ष मनोगतात डी डी पाटील यांनी सामाजिक जाणीव निर्माण होण्याचे महत्त्व स्पष्ट करा पर्यावरण संवर्धन व वैज्ञानिक दृष्टिकोन याचे महत्त्व शिबिरार्थींना समजावून सांगितले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ राहुल इंगळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा रमेश पावरा, डॉ.जयवंतराव पाटील, डॉ भगवान भालेराव, डॉ किशोर पाटील, डॉ प्रशांत पाटील, प्रा मीनाक्षी इंगोले, डॉ. प्रविण पावरा, डॉ शैलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. लीलाधर पाटील यांनी केले तर महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. संगीता चंद्राकर यांनी आभार मानले. सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात 75 विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग असणार आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी राहुल कुकडे, तन्मय चौधरी, मानसी राजपूत आदी विशेष परिश्रम घेत आहेत.