सायंकाळी मतदारांची अनेक केंद्रांवर गर्दी, यंदा झाली कोट्यवधीची उलाढाल…
अमळनेर:- अमळनेर विधानसभा मतदार संघात काल एकूण ६५.६१ टक्के मतदान झाले. सायंकाळी लक्ष्मी दर्शनानंतर मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. पाच मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने यंत्र बदलण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचे नियोजन आणि पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या चोख बंदोबस्तामुळे निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडली. दरम्यान तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ४.३ टक्के मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान झाले होते. ३ वाजेपर्यंत ३९.३४ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.१ टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत होता. मात्र चार नंतर मतदारांची गर्दी वाढत गेली. १,०४,०६६ पुरुष व ९८,१८० स्त्रिया अश्या एकूण २,०२,२४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पहाटे साडे पाच वाजता मॉक पोलला सुरुवात झाली. पातोंडा येथील मतदान केंद्र क्रमांक ५७ वर कंट्रोल युनिट चे बटन खराब झाल्यामुळे ते वेळीच बदलवण्यात आले. तर अमळनेर येथील २१० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आणि २५९ क्रमांकाचे चोपडाई केंद्रावर बॅलेट युनिटचे बटण खराब झाल्याने तेही वेळीच बदलण्यात आले. मात्र प्रत्यक्ष मतदान सुरू झाले तेव्हा शिरूड येथील २५६ क्रमांकाचे मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट आणि अमळनेर येथील १३३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटच्या पावत्या कट होत नसल्याने तेही बदलण्यात आले. दरम्यान मतदानांनंतर तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.
एम फॅक्टर ठरवणार अमळनेरचा आमदार…
दरम्यान अमळनेर विधानसभा मतदार संघात मराठा समाज, माळी समाज, मुस्लिम समाज आणि मनी (पैसे) हे घटक निवडणुकीवर परिणाम करणारे घटक ठरणार आहेत.
सर्वसाधारणपणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला बाहेरगावचे मतदार येत नव्हते. ग्रामपंचायतीला एक एक मतदार महत्वाचा असल्याने लांबून मतदार मागवले जायचे. मात्र यंदा चुरस जबरदस्त असल्याने नेहमीप्रमाणे सुरत, मुंबईसह बंगलोर,राजकोट, चिपळूण, वापी, अंकलेश्वर, वापी, प्रितमपूर, नाशिक, फलटण येथून ऊसतोड कामगार मतदानासाठी आले होते.
यंदा मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचे दर्शन…
ग्रामपंचायत, विका सोसायटी , जिल्हा बँक याप्रमाणे मतदारांना महालक्ष्मीचे दर्शन झाले. त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदार संघात कोट्यवधींच्या वर उलाढाल झाली.
दुपारी अनिल भाईदास पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दुसऱ्या उमेदवाराचा अनुक्रमांक ४ होता. मात्र त्यांच्या नावाने मंत्री अनिल पाटील यांच्या आवाजात मतदानाचे आवाहन करून माझा अनुक्रमांकइतके म्हणण्यापर्यंत आणि नंतर दुसऱ्या आवाजात चार वर मतदान करावे असे आवाहन करून मतदारांची दिशाभूल करण्याचे कारस्थान करण्यात आले.