दुकान जळून खाक,सुमारे 22 लाखांचे नुकसान…
अमळनेर:- शहरातील बाजारपेठेतील नगरपरिषद मालकीच्या लालबाग शॉपिंग सेंटर मधील शाम शु सेंटर या दुकानाला दि 17 च्या रात्री शॉर्टसर्किटने अचानक आग लागून या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या घटनेत मालासह सुमारे २२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे
विशेष म्हणजे वेळीच ही घटना निदर्शनास आल्याने व तातडीने अग्निशमन बंब पोहोचल्याने आगीवर नियंत्रण येऊन या संकुलातील इतर दुकाने आगीपासून बचावली असून मोठा अनर्थ टळला आहे.हिरानंद पंजाबी यांचे हे दुकान असून चप्पल व बूट विक्रीचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या दुकानाचे नावलौकिक आहे.शनिवार दि 17 रोजी रात्री 9 वाजता दुकान मालक पंजाबी हे दुकान बंद करून घरी गेले असता साधारणपणे साडेनऊ पावणे दहा वाजता त्यांच्या दुकानाच्या बाहेर खारी व पाव विक्री करणाऱ्या विक्रेत्यास घरी जाण्याआधी अचानक दुकानाच्या शटरच्या आतून प्रकाश बाहेर येत असल्याचे जाणवले. काहीतरी गडबड असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने लागलीच हिरानंद पंजाबी यांना फोन करून बोलावून घेतले ते आल्यानंतर त्यांनी शटर उघडताच आगीचे मोठे लोट बाहेर येऊ लागले. यावेळी मोठी गर्दी येथे झाली होती. त्यानंतर लगलीच अग्निशमन बंब बोलविल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू करून आग विझविणे सुरू केले,थोड्या वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. मात्र तोपर्यंत दुकानातील फर्निचर, चप्पल,बूट,सीसीटीव्ही कॅमेरे यासह इतर वस्तू जळून खाक झाल्या होत्या तर पाण्याच्या माऱ्यामुळेही बराचसा माल खराब झाला.मात्र वेळीच आग विझवली गेल्याने या संकुलातील इतर दुकानांना याची झळ पोहोचली नाही.कदाचित रात्री उशिरा ही आग लागली असती किंवा ही घटना त्या पाव विक्रेत्याच्या निदर्शनास आली नसती तर या रांगेतील इतर दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन मोठा अनर्थ झाला असता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
दरम्यान दुसऱ्या दिवशी सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून यात 22 लाखांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले आहे.