खापरखेडा येथील घटना,वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन…
अमळनेर:- सद्यस्थितीत खान्देशात अनेक ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या घटना घडत असताना अमळनेर तालुक्यात देखील बिबट्याचे पाऊल पडले असून खापरखेडा प्र. जळोद येथे बिबटयाने वासराचा फडशा पाडल्याची घटना घडल्याने ग्रामीण भागात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.
सदर घटनेनंतर वन अधिकाऱ्यांना पाचारण केले असता पायाच्या ठस्स्यावरून आणि वासराला मारण्याच्या पद्धतीवरून तो प्राणी बिबटयाच असण्याची शक्यता वर्तविली असून ग्रामीण जनतेसह शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. खापरखेडा प्र जळोद येथे गावालगत एन डी पाटील यांचा खळा असून या शेजारी रविंद्र संतोष पाटील यांचा खळा आहे.याठिकाणी वासरू बांधले असताना दि 15 च्या रात्री बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला.सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली त्यानंतर वन अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय अधिकारी तेथे दाखल झाले.या गणाचे माजी प स सदस्य प्रविण पाटील यांच्या समक्ष घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्याठिकाणी त्या प्राण्याच्या पायाचे ठसे उमटले असल्याने त्याचेही नमुने घेण्यात आले.
दरम्यान सदर प्राणी बिबट्या की अन्य दुसरा प्राणी याचा शोध वन अधिकारी घेत असून त्यांनी शेतकरी बांधवाना रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे,गेल्यास तेथे शेकोट्या कराव्यात,पशुधनास उघड्यावर न बांधता बंदिस्त जागेत बांधावे या पद्धतीच्या सूचना केल्या आहेत.