पीएफएमएस प्रणालीला जिल्हा बँक लिंक नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप…
अमळनेर:- शेतकी संघात भरड धान्य विक्री केलेल्या जिल्हा बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नसून नवीन पेमेंट प्रणालीला जिल्हा बँक लिंक होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
यावर्षी केंद्र सरकारने आणलेल्या पीएफएमएस या नवीन प्रणाली द्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. इतर राष्ट्रीयकृत बँका या प्रणालीला आधीच लिंक असल्याने इतर बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळाले आहेत. तालुक्यातील १४६ शेतकऱ्यांचे पैसे यामुळे अडकले असून रक्कम तब्बल ८४ लक्ष ५४ हजार रुपये इतकी आहे. अडीच ते तीन महिने उलटूनही जिल्हा बँक या पब्लिक फंड मॉनिटरिंग सिस्टमला लिंक करण्याचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप होत असून नाराजीचा सुर उमटत आहे. तसेच लवकरात लवकर ही प्रणालीला जिल्हा बँक लिंक करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत विचारणा केली असता संपूर्ण राज्यातील जिल्हा बँक खातेदारांचे पैसे अडकले असून याबाबत लवकरात लवकर मार्ग निघेल अशी माहिती मिळाली आहे.
“पीएफएमएस प्रणालीला बँक लिंक झाल्यावर दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पडणार. कधीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार याची माहिती शासनातर्फे देण्यात आली नसली तरी लवकरच मार्ग निघेल अशी आशा आहे.“
गजानन मगरे,
जिल्हा पणन अधिकारी, जळगांव
“अमळनेर तालुक्यातील ज्वारी विक्री केलेल्या १२० शेतकऱ्याचे ७२.४७ लक्ष व मका विक्री केलेल्या २६ शेतकऱ्याचे १२.०७ लक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची बाकी आहे. लिंक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तात्काळ हे पैसे जमा होतील.“
संजय डी पाटील,
व्यवस्थापक, अमळनेर शेतकी संघ