पावसाने चांगली सुरुवात केल्याने काही गावांना सुखद धक्का…
अमळनेर:- तालुक्यात भरपूर पाऊस पडल्याने बऱ्याच ठिकाणी विहिरींना पाणी आले म्हणून सहा गावांचे टँकर बंद करण्यात आले आहेत. सहायक गटविकास अधिकारी अमोल भदाणे यांनी तहसीलदारांना पत्राद्वारे कळवले आहे.
तालुक्यात सुमारे ३० ते ३२ गावांना पाणी टंचाई असल्याने टँकर सुरू होते. तीव्र उन्हाळ्यामुळे दोन तीन महिन्यांपासून टंचाईमुळे ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र गेल्या आठ दिवसात काही गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने तेथील लहान नद्या ,नाले वाहू लागले. शेतशिवारात पाणी साचल्याने विहिरींना पाणी आले आहे.
तालुक्यातील रणाईचे बुद्रुक, रणाईचे खुर्द, लोण पंचम, लोण चारम,गलवाडे बुद्रुक, चोपडाई या गावांचे टँकर बंद करण्याचे आदेश काढण्यात आले असून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांन देखील आदेश पाठवण्यात आले आहेत. प्रशासनाने वेळोवेळी गांभीर्याने दखल घेऊन टँकर भरण्याचे नियोजन नीट केल्याने टंचाई असताना देखील वेळेवर पाणी पोहचवले जात होते.
प्रतिक्रिया…
ज्या ज्या गावांच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना किंवा यंत्रणा असलेल्या स्रोताना पाणी आले आहे त्या गावचे टँकर बंद करण्यात येतील. – महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी, अमळनेर