दोन दिवसांपासून ज्वारी खरेदी बंद, ३५० शेतकरी प्रतीक्षेत…
अमळनेर:- शासकीय ज्वारी खरेदीला गोदाम उपलब्ध नसल्याने पुन्हा खोडा बसला असून दोन दिवसांपासून ज्वारी खरेदी बंद झाली आहे. आतापर्यंत ६३ शेतकऱ्यांची २ हजार ८०० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे.
शासनाने उशिराने ज्वारी खरेदीचे आदेश दिल्यानंतर अमळनेर तालुक्यात गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीला उशीर झाला होता. मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम उपलब्ध आहेत मात्र त्यांची सुमारे १५ लाख रुपये गोदाम भाड्याच्या रूपाने महसूल विभागाकडे थकबाकी असल्याने त्यांनी गोदाम उपलब्ध करून देण्यास नकार दिला. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शेतकी संघाचे गोदाम उपलब्ध करून दिल्याने खरेदी सुरू झाली. सुरुवातीला अमळनेर तालुक्यासाठी फक्त २६०० क्विंटलचे उद्दिष्ट आल्याने शेतकी संघाचे गोदाम पुरेसे होते. नंतर शासनाने आणखी ५ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिल्याने तालुक्यात २८०० क्विंटलची खरेदी होताच गोदाम फुल्ल भरले. माल ठेवायला जागा नसल्याने दोन दिवसांपासून शासकीय ज्वारी खरेदी थांबवण्यात आली आहे. आणखी सुमारे ३५० शेतकरी प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याने माल ठेवायला जागा नाही आणि खरेदी बंद अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला होता आणि इकडे शासन शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे.
प्रतिक्रिया…
तहसीलदारांनी मार्केटिंग फेडरेशनकडे गोदमाची मागणी केली आहे. मार्केटिंग फेडरेशनने वरिष्ठांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. अद्याप मंजुरी आलेली नाही.
– जे एन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जळगाव