परिसरातील नाले तुडुंब भरून वाहिले, विहिरींची पातळी कमालीची उंचावली…
अमळनेर:- तालुक्यात पुन्हा पावसाने जवखेडा, आंचलवाडी शिवारात थैमान घातले. कित्येक एकर शेती वाहून गेली आहे. नाले तुडुंब वाहिले तर विहिरी जमीन पातळीवर भरल्या होत्या.
२७ रोजी सायंकाळी अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेली जवखेडा, आंचलवाडी या गावात अतिवृष्टी झाली. जवखेडा येथे ग्रामपंचायतीजवळ गाव दरवाज्याच्या बाहेर नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावात प्रवेश करणे अवघड होते. पेरणी होऊन पिके उगवली होती मात्र अतिवृष्टीने पिके तर काही शेतातली माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. २८ जून पर्यंत तालुक्यात १८९.५१ मिमी पाऊस होऊन गेला आहे. आठ दिवसांपूर्वी लोंढवे, निसर्डी, खडके, वाघोदे भागात जशी अतिवृष्टी झाली तशीच अतिवृष्टी जवखेड्याला झाली. मात्र जवखेड्याचे महसूल मंडळ वावडे असून त्याठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा असल्याने तेथे ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. महावेध आणि महसुलाच्या यंत्रणेत देखील मोठी तफावत आढळून आली आहे.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी पंचनाम्यासाठी पथक पाठवले होते.तलाठी स्वप्नील कुलकर्णी, कृषी सहायक दीपाली सोनवणे, ग्रामसेवक न्हायदे यांनी संयुक्तिक रित्या प्राथमिक पंचनामा केला. सुनील गुलाबराव पाटील,राजेंद्र भटा पाटील, रमेश भुरा पाटील यांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसऱ्या दिवशी देखील शेतांमध्ये पाणी साचलेले होते. यावेळी उपसरपंच जिजाबराव पाटील, माजी सरपंच नेताजी पाटील, प्रशांत पाटील, कोतवाल दिलीप पाटील, मयूर गोसावी, ज्ञानेश्वर पाटील, भूषण जैन उपस्थित होते.
अमळनेर मंडळात ३६ मिमी, शिरूड मंडळात ३४ मिमी, पातोंडा मंडळात २१ मिमी, मारवड मंडळात १६, नगाव १०, अमळगाव २५, भरवस ३६, वावडे ४० मिमी असा पाऊस पडला आहे.