स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगावातील टाकळी येथून घेतले ताब्यात…
अमळनेर:- अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी प्रकरणातील गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथून शिताफीने अटक केली.
अमळनेर परिसरातील वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना घरफोडी चोरीचे गुन्ह्यांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. स.पो.नि. विशाल पाटील तसेच अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेकॉ कमलाकर बागुल, पोहेकॉ संदिप पाटील, पोहेकॉ प्रविण मांडोळे, पोकॉ ईश्वर पाटील, चालक पोकॉ मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार करुन त्यांना अमळनेर शहर व तालुका परिसरातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे कामी मार्गदर्शन केले होते. यात सावखेडा (ता. अमळनेर) येथील घरफोडी करणारा आरोपी किरण तुकाराम बारेला (सोलंकी) (वय २७ मुळ रा. दुदखेडा ता. सेंधवा जि. बडवाणी) हा टाकळी प्र.दे. ता. चाळीसगांव येथे असल्याची गोपनिय माहिती पोहेकॉ प्रविण मांडोळे यांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि. बबन आव्हाड यांच्या आदेशावरून कारवाईस पथकाला पाठवले. पथकाने तात्काळ टाकळी प्र.दे. ता. चाळीसगांव येथे जाऊन शोध घेत आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. त्यास सावखेडा (ता. अमळनेर) येथील घरफोडी बाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास त्याचेवर संशय आला म्हणून पथकाने त्यास ताब्यात घेवून सविस्तर विचारपूस करता त्याने सुमारे ५ महिन्यापूर्वी सावखेडा गावी घरफोडी केल्याचे माहिती दिली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरनं. ३९/२०२४ भा.द.वि. ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यास रिपोर्टासह पुढील कारवाईकामी अमळनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे. या गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.