अमळनेर:- मुदत संपलेले खत विक्री करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या खत विक्रेत्याची तक्रार प्राप्त झाल्यावर कृषी विभागाने याठिकाणी तपासणी केली असता ४० बॅग विक्री झाल्याची घटना तालुक्यातील शिरूड येथे घडली.दि २५ रोजी सकाळी ११ वाजता शिरूड गावातील शेतकऱ्यांनी कृषी उपविभाग यांच्याकडे बोगस खतविक्री झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, पंचायत समिती कृषी अधिकारी देवेंद्र ठाकूर व कृषी सहाय्यक सुभाष पाटील आदींच्या पथकाने जाऊन शिरूड येथील मुकेश देविदास पवार यांच्या मालकीच्या श्री गुरुदेव दत्त कृषी सेवा केंद्रावर जाऊन स्टोक रजिस्टर तपासणी केली असता. यावेळी न्यूट्रॉ प्रोमीन बायोटेक कंपनी जळगाव येथील ४० बॅग्स खत विक्री झाल्याचे आढळले. या बॅगेची तपासणी केली असता मुदत असलेल्या जागेवर मुदत संपलेली आढळली. मात्र त्यावर मार्कर ने रेष मारून मुदत वाढवलेली आढळली. कायद्याने हे मुदत संपलेले खत विक्री करता येत नाही. शिवाय या खतात जे जे घटक योग्य आहेत की नाही यासाठी सदर खताचे नमूने घेण्यात आले. ते नमुने नाशिक येथील खत परीक्षण प्रयोगशाळा नाशिक याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याबाबत किशोर शिवाजीराव पाटील, भालेराव चिंतामण पाटील, वसंत उत्तम पाटील, दीपक रामलाल पाटील, हरिचंद्र किसन पाटील, गोपाल महाराज नानासाहेब पाटील हे तक्रारदार शेतकरी व कंपनी प्रतिनिधी आदी हजर होते. यावेळी उपविभाग कृषी अधिकारी साठे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी ठाकूर यांनी संयुक्त पंचनामा करून सदर पंचनामा प्रत तक्रारदारांना सोपवली. व याबाबत वरिष्ठांना ही माहिती देऊन अहवाल पाठवण्यात आला आहे.