चिखल आणि खड्डयातून कसरत करत निघाली तस्लिमबी यांची अंत्ययात्रा
अमळनेर : शहरातील जपान जीन भागात सर्वच भागात चिखल साचल्याने अंत्ययात्रेत सामील झालेल्या नागरिकांचे तर हाल झालेच परंतु मयत महिलेला मृत्यूनंतर देखील हाल अपेष्टा आणि सर्कस करत दफन भूमीत जावे लागल्याने रहिवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
शहरातील जपान जीन भागात सुमारे १५० घरे असून पालिकेकडून नियमित कर वसुली केली जाते. गेल्या वर्षभरात नगरपालिकेला मूलभूत सुविधा रस्ते आणि गटारी करण्याबाबत तीन चार वेळेस निवेदन दिल्यानन्तरही नगरपालिकेने या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अध्यक्ष सैय्यद अझहरअली शौकत अली यांनी केला आहे.
३० रोजी रात्री १० वाजता या भागातील महिला तस्लिम बी हमीद खा पठाण यांचा आजारामुळे मृत्यू झाला. या भागातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड चिखल झाल्याने साधे चालणेही मुश्किल होते. म्हणून अंत्ययात्रा कशी काढावी असा प्रश्न रहिवाश्याना पडला होता. रात्री मुख्याधिकारी आणि उपमुख्याधिकारिनी फोन उचलला नाही म्हणून सकाळी अझरअली , सलीम हाजी , कलाम अहेलकर , इम्रान शेख नबी सैय्यद , आसिफ अली ,सलमान बागवान , शाहहरुख पठाण ,नईम सिकलीकर ,जावेद अली यांनी नगरपालिका गाठली. मात्र अधिकारी सुट्टीवर होते आणि कर्मचारी व्यवस्थित उत्तरे देत नव्हते. अखेरीस तशाच अवस्थेत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत सामील झालेले स्थानिक नागरिक आणि बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांना सर्कस ,कसरत करत जावे लागले. जनाजा घेऊन जाणाऱ्यांचे पाय सटकत होते त्यामुळे शव देखील इकडे तिकडे हलत होते. नगरपालिकेच्या असुविधांमुळे जिवंतपणी यातना भोगाव्या लागणाऱ्या तस्लिम बी ला मृत्यूनंतरही यातना भोगाव्या लागल्याने रहिवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. नगरपालिकेने तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर येथील नागरिक कर न भरता मोठे आंदोलन करतील असा इशारा सैय्यद अजहरअली यांनी दिला आहे.