महाराष्ट्र गोसेवा अध्यक्षांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली मागणी…
अमळनेर:- राज्यातील १५ जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला असला असून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र गोसेवा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना पत्राद्वारे केली आहे. जय जिनेंद्र फाउंडेशनच्या मागणीनुसार गोसेवा आयोगाने दखल घेतली आहे.
पावसाळ्यात दुष्काळ आणि अवकाळीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने यंदा चारा उत्पादन कमी झाले आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे मुश्किल झाले आहे. बाजारात गुरांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली आहे तर काही गुरे कत्तलखान्यात पाठवली जात आहेत. काही शेतकरी आपली गुरे गोशाळेत पोहचवून जात आहेत. मात्र महाराष्ट्रात गोशाळांना अनुदान नसल्याने क्षमतेपेक्षा जास्त गुरे आल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरे विक्रीचे बाजार तात्काळ बंद करावेत, गुरांची वाहतूक बंद करावी आणि लहान शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी जिनेन्द्र फाउंडेशनचे राजकुमार छाजेड यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी गुरांसाठी चारा छावण्या व पाण्याची व्यवस्था करण्याबाबत मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांना पत्र दिले आहे.