अमळनेर-आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय शासकीय संघटनांनी दिनांक 29 ऑगस्ट पासून संप पुकारला होता,यात महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटनाही सामील होती. मात्र इतर संघटनांनी संप स्थगित केला असला तरी नगर परिषद संवर्ग कर्मचारी आपल्या संपावर ठाम असल्याने अमळनेर न प चे संवर्ग कर्मचारी संपावर उतरले आहेत.
काल सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांनी न प कार्यालया बाहेर ठिय्या मांडून निदर्शने केलीत,यावेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की राज्यातील साडेतीनशेपेक्षा जास्त नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्याचे कार्य केले जाते. शासनाच्या विविध योजना, विकासकामे इत्यादींसह कोरोना महामारीच्या कामात सर्वच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून कोविड योद्ध्याचे काम केले तथापी शासनाचे विविध विभाग नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीच मानायला तयार नाहीत, राज्यातील नगर परिषदांमध्ये 2005 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत 2005 साली लागू झालेली डिसीपीएस पेन्शन योजना आणि 2015 साली लागू झालेली एनपीएस पेन्शन योजना प्रत्यक्षात लागू झालेली नाही. त्यामुळे इतर शासकीय विभागाच्या कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजनेची मागणी करत असतांना नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटना मात्र कोणतीही पेन्शन लागू करा पण लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी करत आहे. या व अश्या इतर मागण्यांसाठी हा संप होत आहे.
उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,विद्युत अभियंता
प्रशांत ठाकूर, नगर अभियंता अमोल भामरे, उपनगर अभियंता डीगंबर वाघ,आस्थापना प्रमुख नेहा पाटील,कर निरीक्षक रवींद्र चव्हाण, रवींद्र लांबोळे,स्वच्छता निरीक्षक
संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे,लेखापाल सुदर्शन शामनानी, लेखापरीक्षक चेतन गडकर,संगणक अभियंता संदीप पाटील,
सोमचंद संदांशिव, महेश जोशी आदी सहभागी होते. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनाही संपाला पाठींबा दिला आहे.