सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद…
अमळनेर:- तालुक्यातील सुंदरपट्टी येथील तरुणावर झालेल्या चाकू हल्लातील संशयित अद्यापही फरार असून त्यांना अटक करण्याची मागणी जखमी तरुणाचे पिता सुरेश पाटील यांनी केली आहे
. सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मागील एका भांडणाच्या कारणावरुन गोपाल उर्फ उमाकांत सुरेश पाटील (रा.सुंदरपट्टी) हा त्यांचा मुलगा १७ रोजी जळगाव येथून न्यायालयीन कोठडीतून जामीनावर सुटका होऊन अमळनेरकडे मोटारसायकलवरुन येत असताना मुसळी गावाच्या पुढे सुमारे १ किमी अंतरावर अगोदरच उभे असलेल्या सागर ज्ञानेश्वर खैरनार, विजय रमेश देवरे आणि आकाश उर्फ राघव नंदू जाधव या तिघांनी गोपालवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू सारख्या हत्याराने डोक्यावर, पाठीवर व कानावर हल्ला केला. त्यात गोपाल हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारार्थ धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. अद्यापही त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी गोपालचे मामा किशोर दिलभर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १७ रोजी धरणगाव पोलिसांत महेंद्र शालिग्राम बोरसे व अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या तपासात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ३१ ऑगस्ट रोजी सागर ज्ञानेश्वर खैरनार, विजय रमेश देवरे आणि आकाश उर्फ राघव नंदू जाधव या तिघांना अटक केली.पोलिसांनी अधिक तपास केला असता महेंद्र बोरसे याचा लहान भाऊ विनोद बोरसे याचेही नाव संशयित म्हणून आले आहे.
फरारी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी हल्ल्यातील जखमी गोपाल पाटील यांचे वडील सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.