
गुन्हा दाखल केल्याने माझ्या जीवाला धोका- विजय पाटील
अमळनेर:-ऑप्टिकल फायबर टाकण्याचा कंत्राट देतो म्हणून जामनेरच्या राहुल चव्हाण व सागर चव्हाण या बंधूनी राज्यभरात अनेकांची फसवणूक केली असल्याचा आरोप अमळनेरचे विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत करत आपण त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने माझ्या जीवाला धोका असल्याचे त्यानी सांगितले.
विजय पाटील यांची सुमारे साडे अकरा लाख रुपये घेऊन दोघांनी फसवणूक केली आहे. विजय धनराज पाटील हे अमळनेर येथील पवन चौक येथील रहिवासी असून येथेच व्यंकटेश इंटरप्रायझेस नावाची त्यांची फर्म आहे. जामनेर येथील राहुल दत्तात्रय चव्हाण, सागर दत्तात्रय चव्हाण या दोघांनी विजयच्या घरी येऊन तुम्हाला ऑप्टिकल फायबर कंत्राट देतो असे सांगून १५ लाख रुपयांची मागणी केली. विजय यांनी टप्प्याटप्याने ११ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र दोघे चव्हाण बंधूनी ऑप्टिकल फायबर केबलचा ठेका दिला नाही. विजयने पैशाची मागणी केली असता दोघांनी तगादा लावू नको अन्यथा तुला संपवून टाकू अशी धमकी दिली. यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या गुन्ह्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विजय पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यांनी यावेळी सांगितले की परिस्थिती नसताना कर्ज काढून मी या लोकांना पैसे दिलेत,आता पैसे मिळत नसल्याने माझी परिस्थिती खालावली आहे,अनेक ठिकाणी फसवणूक केली असताना राजकीय दबदबा मुळे त्यांना फावत आहे,असे प्रकार करून मोठे साम्राज्य त्यांनी निर्माण केले आहे.गुन्हा दाखल केल्यानंतर जीवाला धोका असला तरी फसवणूक केलेल्या इतरांना सोबत घेऊन मोठा लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

