प्रवाश्यानी केली ठेकेदार व अभियंत्यावर कारवाईची मागणी…
अमळनेर : जळगाव रस्त्यावर असलेला चांदणी कुऱ्हे गावाजवळील रेल्वेचा अंडरपास बोगदा प्रवाश्यांसाठी घातक ठरत आहे. बोगद्यात अजूनही साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने हा कमर तोड बोगदा ठरत आहे.
बऱ्याच विलंबानंतर कुऱ्हे येथील अंडरपास बोगदा पूर्ण करण्यात आला. मात्र या बोगद्यावर पत्री शेड नसल्याने पावसाचे पाणी सतत साचत होते. यंदा ज्यादाच्या पावसाळ्यामुळे नोव्हेंबर महिना अर्धा उलटला तरी बोगद्यातील पाणी संपायला तयार नाही. अनेकदा वाहतूक खोळंबली. प्रवाश्याना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ढेकू मार्गे रस्ता खराब झाला असून रस्त्याचे काम सुरू असल्याने अभिमानाने हायब्रीड ऍन्यूटी अंतर्गत झालेल्या टाकरखेडा मार्गे राज्यमार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चार महिन्यात मणक्याचे रुग्ण वाढले
बोगद्यात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या वर्षभरात तेथे मोठे खड्डे पडले आहेत. मोठया डबक्याप्रमाणे पाणी साचलेले असल्याने मोटरसायकलस्वार , चारचाकी वाहन चालक याना खड्डे दिसत नसल्याने प्रवाश्याना अचानक जोरदार झटके बसत असल्याने अनेकांना कमरेचा व पाठीच्या मणक्याचा त्रास जाणवु लागला आहे. गेल्या चार महिन्यात हाडांच्या डॉक्टरांकडे रुग्ण संख्या वाढली आहे. यासोबतच वाहनांचे चाके असंतुलित होत असल्याने त्याचेही दुष्परिणाम जाणवत आहेत.
पाण्याची सायकल सुरूच…
विशेष म्हणजे या बोगद्यातून सातत्याने मोटर लावून पाणी काढले जात आहे. हे पाणी शेजारील शेताच्या डबक्यात टाकले जाते. मात्र भिंती निकृष्ट दर्जाच्या झाल्याने विहिरी झिरपतात त्याचप्रमाणे या बोगद्यातून पाणी झिरपत आहे. त्यामुळे पाणी कमी होत नाही आणि प्रवाश्यांचा त्रासही कमी होत नाही.
ठेकेदार व अभियंत्यावर कारवाईची मागणी…
प्रवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत तर टाकलेच पाहिजे परंतु शेड नसलेला आणि अंडरपास यशस्वी नसताना अंडरपास बोगद्याचा प्रस्ताव तयार करणाऱ्या अभियंत्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.