शासकीय उपसा सिंचन योजना 3 व 4 चे गांधली येथे भूमिपूजन
अमळनेर– निम्न तापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात 25 हजार हेक्टर म्हणजेच सुमारे 70 ते 75 हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दुपटीने वाढलेला असेल, यामुळे शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावणार आहे. मी काम करणारा माणूस असल्याने काम करूनच दाखवीत आहे, अशी भावना माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली.
शासकीय उपसा सिंचन योजना 3 व 4 चे भूमिपूजन गांधली येथे आमदार पाटील यांच्या हस्ते व खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधली जवळ सप्तश्रृंगी मंदिर समोर करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की गेल्या पाच वर्षात मी पाडळसरे धरण सुप्रमा, महसूल ची नवीन प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, बस स्टँड नुतनीकरण, ग्रामीण रुग्णालय चे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर, शहरातील विविध रस्ते, शहरात 200 कोटीची 24 बाय 7 (दररोज पाणीपुरवठा) नवीन पाणीपुरवठा योजना एवढी कामे मार्गी लावली असून या योजनेचे 27 कि.मी पाईप लाईन टाकण्याचे कामही सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांची कामे थांबवली आहेत. खरे पाहता येणाऱ्या काळात
पाण्यासाठी युद्ध होतील अशीच परिस्थिती आहे. पूर्वी तामसवाडी व अक्कलपाडा धरणामध्ये आपल्यासाठी पाणी आरक्षण राहू दिले नाही आणि कुणी लोकप्रतिनिधीनी तसे प्रयत्न केलेच नाहीत. आपल्या धरणातील तापी चे 7 टी एमसी पाणी देखील खडसे यांनी त्यांच्याकडे वळवून घेतले. मी खरंच सांगतो, तुम्ही मला निवडून दिले नसते तर हे धरण कधीही झाले नसते, मी भांडलो व पाठपुरावा केला म्हणूनच आता 10 टी.एम.सी चे धरण 17 टी.एम.सी चें झाले आहे. धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी राजस्थान मध्ये असलेली टेक्नॉलॉजी आपण वापरत आहोत. त्यासाठी आवश्यक असलेली चौथी सुप्रमा मिळवली. यात पहिल्या टप्प्यात पाच शासकीय सिंचन योजनांचा समावेश केल्याने
शेतकरी बांधवांच्या शेतात बंद पाईपलाईन द्वारे पाणी पोहोचणार आहे. मी गेल्या पाच वर्षात लहान मोठे 110 बंधारे बांधून दाखविल्याने यामुळे वॉटर टेबल वाढणार आहे. येणाऱ्या काळात अमळनेर तालुक्यासाठी अक्कलपाडा धरणामध्ये पाणी आरक्षण करण्याचे प्रयत्न असून यामुळे पांझरा चे पाणी माळन नदी मध्ये पोहोचविता येणार आहे. पुढील दुसऱ्या टप्प्यात सात उपसा योजना आणायच्या असून टप्पा दोनसाठी पाठपुरावा आताच सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षे लागतील. पुढील काळात धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होईल त्यासाठी खासदार स्मिताताई व आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगत रेल्वे आणि उद्योग यासाठीही स्मिताताई व मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले
आपले धरण 100 टक्के पूर्ण होणार- खा.स्मिता वाघ
खासदार स्मिता वाघ म्हणाले की गेल्या काळात अजित दादांचा गट सरकार मध्ये सहभागी झाला व आपल्या गावाचा कायापालट झाला, जनतेला काम करणारा व संपर्क ठेवणारा माणूस लागतो, आपले भाग्य आहे की धरण होण्याआधीच उपसा सिंचन योजना मार्गी लागताय, हे धरण सर्वासाठी संजीवनी आहे.
धरण ची काळजी करू नका ते 100 टक्के पूर्ण होणार आहे, कारण आता सर्व योग जुळून आले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील आपल्या सोबत आहेत. आपले पाडळसरे धरण खाली असल्याने उपसा सिंचन शिवाय पर्याय नव्हता, आता बंद पाईपलाईन मुळे 70 टक्के पाणी शेतात पोहोचेल. भविष्यात काहीही राजकीय घडामोडी होवोत तालुका व विकास म्हणून अनिल दादा व मी एकत्रच काम करू आणि सर्व कामे मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी धरणाच्या कामाला खरा वेग अनिल दादानीच दिल्याचे सांगत उपसा सिंचन योजना वरदान ठरणार असल्याचे सांगितले. अमळनेर बाजार समिती सभापती अशोक पाटील यांनी या कामाची इतिहासात नोंद होईल असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शाखा अभियंता भिकेश भटूरकर, कॉन्ट्रॅक्टर अमेय पोपटराव खरमाटे, कल्पेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी तर आभार शत्रूग्न पाटील यांनी मानले. मंचावर माजी जि प सदस्या सौ जयश्री पाटील, प्रा.सुरेश विक्रम पाटील, यशवंत बैसाने, इंजि.जितेंद्र याज्ञीक,
अमोल बिर्हाड उपस्थित होते.
अशी आहे शासकीय उपसा सिंचन योजना-
निम्न तापी पाडळसे प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, पारोळा व धरणगाव तालुक्यातील टप्पा -१ नुसार २५६५७ हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे, लाभक्षेत्रात एकूण ७४ गावांचा समावेश होतो. सदर प्रकल्प अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेत पहिल्या टप्प्यात पाच
शासकीय उपसा सिंचन योजनांचा समावेश झाला आहे. आता भूमिपूजन झालेली उपसा सिंचन योजना क्र. ३ असून ता.अमळनेर प्रकल्पाच्या टप्पा १ मध्ये प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या डाव्या तिरावरील धरणापासुन ९.०० कि.मी. अंतरावर मौजे कलाली, ता. अमळनेर येथे या योजनेचे मुख्य पंपगृह आहे. तसेच ८१६ अश्वशक्ति चे ५ पंप मशीनीच्या मदतीने मोजे कलाली येथून पाणी उचलून ते १६३० मी.मी. व्यासाची व १०.९ किमी. लांबी असलेल्या उर्ध्वगामी नलिका क्र. ५ द्वारे मौजे गांधली येथील वितरण कुंडात सोडून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे अंदाजे ३९१२ हे. क्षेत्रास बारमाही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
सदरील योजनेच्या लाभक्षेत्रात अमळनेर तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.व त्याअन्वये ३२५५ गट धारकांना लाभ होणार आहे. सदर उपसा सिंचन योजनेचा अंदाजित खर्च रु.२२९.५२ कोटी आहे.
तसेच शासकीय उपसा सिंचन योजना क्र. ४. ता. अमळनेर हि योजना प्रकल्पाच्या टप्पा -१ मध्ये प्रस्तावित आहे. सदरील योजनेचे पंपगृह हे उ.सि.यो. क्र. ३ च्या मौजे गांधली येथील वितरण कुंडावरून सुरुवात होणार आहे. तसेच ८८० अश्व शक्ति चे ४ पंप मशीनीच्या मदतीने मौजे गांधली येथील वितरण कुंडावरून पाणी उचलून ते १२६६ मी.मी. व्यासाची व १६.६ किमी लांबी असलेल्या उर्ध्वगामी नलिका क्र. ६ द्वारे मौजे राजवड व पुढे १२३० मिमी. व्यास व ६.३ किमी लांबो असलेल्या ग्राविटी मेन द्वारे मौजे रत्नापिंप्री ता. पारोळा येथील वितरण कुंडात सोडून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे वरील दोघे वितरण कुंड मिळून अंदाजे ५९२१ हे. क्षेत्रास बारमाही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सदरील योजनेच्या लाभक्षेत्रात अमळनेर तालुक्यातील १०, पारोळा तालुक्यातील ७ व धरणगाव तालुक्यातील १ असे एकूण १८ गावांचा समावेश आहे. व त्याअन्वये ५२१५ गट धारकांना लाभ होणार आहे. सदर उपसा सिंचन योजनेचा अंदाजित खर्च रु.२१७.९७ कोटी आहे.
तसेच शासकीय उपसा सिंचन योजना १ आणि २ चे मुख्य पंप बोहरा येथे राहणार असून दुसरे पंप खेडी येथे असणार आहे. या योजनेचेही काम सुरू झाले असून योजना क्रमांक ५ चोपडा तालुक्यासाठी असणार आहे. अमळनेर तालुक्यातील चारही योजनेचे मेन पाईपलाईन चे काम झाल्यानंतर सर्वत्र सब पाईपलाईन टाकली जाणार आहे.