अमळनेर:- मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाच्या कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, दि. 11 जानेवारी 2025 रोजी, महाराष्ट्र शासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव याच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 – स्कुल कनेक्ट 2.0 कार्यशाळा” संपन्न झाली.कार्यशाळेची सुरुवात विद्येची देवता सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, प्रमुख मार्गदर्शक व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. माधव वाघमारे, संस्थेच्याच सुरजमल हिरालाल मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौपदाबाई फकीरा साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मीकांत सैंदाणे, पर्यवेक्षक संजय बागुल व कार्यशाळेचे समन्वयक व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. सतीश पारधी हे होते. सदर कार्यशाळा इयत्ता 9वी, 10वी, 11वी व 12 वीचे विद्यार्थी तसेच पालकांसाठी आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात होणारे बदल सर्वांना माहीत व्हावे यासाठी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. तद्नंतर मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल माहिती देताना शैक्षणिक धोरणाची आवश्यकता, ध्येय, उद्दिष्टे व एकूण शैक्षणिक बदल आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. संजय बागुल यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काळाची गरज असल्याचे सांगून धोरणातील विद्यार्थी केंद्रित मुद्द्यांवर लक्ष वेधले.
तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. लक्ष्मीकांत सैंदाणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी केंद्रित कौशल्य विकास, पायाभूत विकास, रोजगाराच्या विविध संधी याबाबत मार्गदर्शन केले.
तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वसंत देसले यानी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण 2020 समजावून देत, विषय निवडीचे स्वातंत्र्य, श्रेयांक पद्धती, मेजर व मायनर पदवी पद्धती, विद्यार्थी हिताच्या तरतुदी याबाबत माहिती दिली.
या कार्यशाळेत विद्यापीठाकडून आलेले पी. पी. टी. प्रेझेंटेशन प्रा. डॉ. पवन पाटील यांनी केले. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी मानले. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, इयत्ता 9 ते 12 वी व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.