खासदार स्मिता वाघ लोकसभेत मांडणार समस्या…
अमळनेर : मतदार संघातील रेल्वेचे सर्वच अंडरपास बोगदे पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाश्यांना त्रासदायक ठरत असून याबाबत काहीतरी ठोस तंत्रज्ञान शोधून प्रवाश्यांचा त्रास थांबवावा अशा सूचना वजा निर्देश खासदार स्मिता वाघ यांनी दिशा कमिटी (जिल्हा नियंत्रण) बैठकीत दिले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे होत्या. दरम्यान देशातील सर्वच अंडरपास बोगद्यांची अवस्था अशीच असल्याने सभागृहात शून्य प्रहरात हा विषय मांडणार असल्याचेही स्मिता वाघ यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाने गेट बंद करण्यासाठी अंडरपास व ओव्हर ब्रिज चा पर्याय काढला. मात्र खर्च वाचवण्यासाठी अंडरपास बोगद्याचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. त्या ठिकाणी पाणी साचते आणि ते पाणी काढण्यासाठी काही कंत्राटी मजूर नेमण्यात आले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी या मजुरांचे पेमेंट केलेले नाही. त्यांनी स्वतःचे पाणी काढण्याचे मशीन घेतले आहेत आणि अधिकाऱ्यांनी माणसे बदलवून टाकली. तसेच अनेक ठिकाणी भूजल पातळी वर असल्याने सतत अंडरपास बोगद्यात पाणी साचते. त्यामुळे प्रवाश्याना त्रास होतो. काही ठिकाणी पाण्यात खड्डे दिसत नसल्याने किरकोळ अपघात होतात. म्हणून देशातील सर्वच अंडरपास बोगद्याबाबत तज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करून समस्या कायमची मिटवावी अशी मागणीही खासदार वाघ यांनी केली आहे.
तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे उतारे भूमीअभिलेख आणि तहसील कोठेही मिळत नाहीत ही एक मोठी समस्या आहे. तर काही उतारे भूमिअभिलेख आणि काही उतारे तहसील ला मिळतात. महसूल व भूमिअभिलेख यांची संयुक्त बैठक घेऊन ही तफावत देखील दूर करावी असेही निर्देश खासदार वाघ यांनी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना दिलेत.
त्याच प्रमाणे मंगरूळ येथील पाणी पुरवठा योजनेला जलजीवन मिशन अंतर्गत मंजुरी मिळालेली आहे. परंतु ग्रामस्थांनी ही योजना तापी नदीवरून करण्यात यावी अशी मागणी केल्याने तसा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव शासनांकडे पाठवलाच नसल्याने स्मिता वाघांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आठ दिवसात तांत्रिक प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीस कॅबिनेट मंत्री संजय सावकारे, आमदार राजुमामा भोळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.