
रेशन दुकानदारांना करावा लागतोय ग्राहकांच्या संतापाचा सामना…
अमळनेर:- शहरातील रेशन ग्राहकांची महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा फरफट होत आहे. नेहमीप्रमाणे या महिन्यातही रेशन दुकानात अजूनही माल पोहोचलेला नाही. जिल्हा गोडाऊनमधून होणारा माल पुरवठा वारंवार उशिराच होतो आहे, यामुळे रेशन दुकानांतील कामकाज ठप्पच झाले आहे.
महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहक रेशन दुकानात चकरा मारत असतात, आणि अखेर माल उपलब्ध होतो तो महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांतच. यामुळे अनेकांना वेळेत धान्य मिळत नाही, तर दर महिन्याला मिळणारी वाढीव मुदत देखील फेब्रुवारी महिन्यापासून बंद करण्यात आली आहे
दुकानदारसुद्धा या परिस्थितीला कंटाळले आहेत. वेळेवर माल न आल्याने त्यांच्यावर ग्राहकांचा रोष ओढवतो आहे. ‘‘आमच्याकडे मालच वेळेवर येत नाही, तर आम्ही ग्राहकांना काय द्यायचं?’’ अशी भावना दुकानदार व्यक्त करत आहेत.
शहरातील रेशन दुकानदारांना दर महिन्याला धान्य वितरण उशीराने होत असल्याने ग्राहकांत संभ्रम आणि नाराजी निर्माण होते. ग्रामीण भागात वेळेत धान्य पोहोचते, मात्र शहराचे धान्य थेट जळगाव येथील एफसीआय गोडाऊनमधून येत असल्याने ते विलंबाने दुकानदारांपर्यंत पोहोचते.
ग्राहकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नसल्याने, “ग्रामीण भागात वाटप सुरू झाले, शहरात का नाही?” असा सवाल दुकानदारांना करण्यात येतो. वस्तुस्थिती अशी आहे की, धान्य थेट दुकानदार नव्हे तर जिल्हास्तरावरून ठेकेदारांच्या माध्यमातून येते. उशीर हा व्यवस्थेतील दिरंगाईमुळे होतो, तरीही संताप दुकानदारांवरच निघतो. तसेच रेशन धान्यासाठी केवायसी करणे बंधनकारक असून अंतिम मुदत 30 एप्रिल आहे. मात्र, शहरात सध्या रेशन दुकानात धान्याचा कोठा नसल्याने ग्राहक रेशन दुकानावर येत नाहीत, त्यामुळे केवायसी प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे.
या सगळ्या गोंधळात सामान्य जनतेचे हाल सुरू आहेत. शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काचे रेशन वेळेवर मिळत नाही.नियमित पुरवठा, वेळेवर वितरण आणि उत्तरदायी यंत्रणा याची आता गरज आहे.
प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
प्रतिक्रिया
धान्य लवकरच पोच होईल व धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल तसेच केंद्रशासन मुदतवाढ देत नाही त्यामुळे दुकानदारांना मुदतीतच धान्य वाटप करावे लागेल.
–रुपेश बिजेवार
सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव
प्रतिक्रिया
शहरी भागातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना कळविण्यात येते की,आपल्याला धान्य उपलब्ध झाले नसल्या बाबत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मा.बिजेवार साहेबांशी बोलणे झाले असता या संदर्भात वरीष्ठ स्तरावर बोलणे चालू आहे डिओ ला मुदतवाढ मिळाल्यास आपली समस्यां मार्गी लागेल आणि जर का वरिष्ठांकडून मुदतवाढ देतोय असा सिग्नल जरी मिळाला तरी माहे मे महिन्याच्या नियतनातून धान्य वर्ग करण्याचा आमचा प्रयत्न आहे…? सदरची समस्यां ही फक्त आपल्याच तालुक्यापुरती नसून 70% जिल्ह्याची आहे. प्रवीण गोसावी अध्यक्ष-अमळनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना