
प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर व तहसीलदार सन्मानित
अमळनेर : महाराष्ट्रात सर्वाधिक ९३ टक्के पाणीपट्टी वसुली करून नगरविकास विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमळनेर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा पालकामंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अमळनेर नगरपरिषदेची ४ कोटी ५८ लाख पाणीपट्टी कराचे उद्दीष्ट असतांना पालिकेने ४ कोटी २३ लाख ९३ टक्के जिल्हयासह राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी वसुली केली. तसेच विकास निधीचे कामे लवकर आणि उत्कृष्ट केली म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर , उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण ,बांधकाम अभियंता डिगंबर वाघ , मयूर तोंडे ,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , सुदर्शन श्यामनानी , विद्युत अभियंता कुणाल महाले , सतीश बडगुजर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , आमदार राजू मामा भोळे , आमदार किशोर पाटील हजर होते. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे १०० टक्के निर्गतीकरण करून योग्य न्याय दिल्याबद्दल उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे व कर्मचारी पंकज शिंपी यांचा देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव केला. तर १४० टक्के महसूल वसुली केल्याबद्दल तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचाही पालकमंत्र्यांनी गौरव केला. अमळनेरच्या प्रशासकीय विभागाने उत्तम कामगिरी करून बक्षीस मिळवल्याबद्दल अधिकाऱ्यांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.