
अमळनेर ते निम रस्त्याचे झाले तीनतेरा, मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने प्रवाशांचे हाल, सा.बां. विभागाचे दुर्लक्ष…
अमळनेर:- तालुक्यातील अमळनेर ते निम पर्यंतच्या २२ किमी अंतराच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक व प्रवासी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील अनेक गावांचा दळणवळणाचा मुख्य मार्ग असलेल्या रस्त्याची चार वर्षापासून फक्त डागडुजी करण्यात येत असून थातुर मातुर काम करण्यात येत असल्याने पावसाळ्यात पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. यंदा मात्र ती डागडुजी हि न झाल्याने रस्त्याचे बारा वाजले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी सध्याची अवस्था आहे. डांबरी रस्ते उखडून खड्डे पडल्यामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. कधी वाहन खड्ड्यातून उसळून नियंत्रण सुटेल व अपघात होईल याचा नेम नाही. अशा खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनाला हादरे बसून तेही वारंवार नादुरुस्त होत असून चाक पंक्चर होणे ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे दुष्काळात तेरावा महिना यानुसार अतिरिक्त खर्च वाढला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांची उदासीनता धोकादायक ठरत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे हाडे खिळखिळी होत असून चारचाकी वाहन चालकांचीही खड्डे टाळून वाहन पुढे नेताना तारांबळ उडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निधी नसल्याचे कारण पुढे करत आहे. निधीअभावी रस्त्यांची दुरुस्ती किंवा पूर्ण रस्ता तयार करणे शक्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे. या गलथान पणामुळे वाहनधारकांचे हाल होत असून पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था होणार आहे. तत्पूर्वी वाहनधारकांवर दया दाखवून खड्डे तरी भरावेत अशी याचना प्रवाश्यांना केली आहे.
पावसाळ्यात सुद्धा पाणी नसलेल्या नाल्यावर कोटींचा पूल, मात्र रस्त्यासाठी निधी नाही…
अमळनेर निम रस्त्यावर पिंपऱ्या नाक्याजवळ असलेल्या छोट्या नाल्यावर जवळपास दीड कोटी खर्चून पूल बांधणार असून ठेकेदाराने खोदकाम केले झाले आहे. ह्या नाल्याला पावसाळ्यात ही पाणी येत नाही तरी त्यासाठी कोटींची तरतूद केली आहे. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पैसे नसल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे हा पूल प्रवाशांच्या सोयीकरता उभारण्यात येत आहे की प्रशासनाच्या व ठेकदाराच्या सोईकरता ? असा सवाल करत अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. सदर पुलाच्या ठेकेदाराने पंधरा दिवसापासून खड्डे खोदून ठेवले असून ऐन पावसाळ्यात काम सुरू करून वाहनधारकांचे हाल करणार असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया…
अमळनेर ते निम रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अनेक अपघातांना आमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यापूर्वी तात्पुरती डागडुजी करावी, नव्याने पूर्ण रस्ता न झाल्यास पावसाळ्यानंतर परिसरातील ग्रामस्थांकडून आंदोलन उभारण्यात येईल. – देवेंद्र साळुंखे, मारवड
प्रतिक्रिया…
सध्या दुरुस्ती किंवा नवीन रस्त्याच्या कामासाठी मंजुरी नसल्याने काहीच करता येणे शक्य नसले तरी पुलाचे काम करतेवेळी दीड किमी रस्त्याचे काम करण्यात येईल. – हेमंत महाजन, सहा. अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर

