
पाण्याची चिंता मिटणार, सेवा सहयोग संस्थेचा होता सहभाग
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे खु. या गावांमध्ये शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी धरती माता महिला शेतकरी गटाकडून सेवा सहयोग संस्थेस पोकलेन मशीनची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन पिंपळे व चिमणपुरी गावाची जल व मृदा संधारणाच्या कामाची गरज ओळखून सेवा सहयोग संस्थेने पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले.

पिंपळे खू. व चिमणपुरी गावामध्ये असणाऱ्या माळन नदी पात्रातील गाळ काढून खोलीकरणाचे कामाचा शुभारंभ झाला. या कामासाठी गावातील ग्रामस्थांनी धरती माता महिला शेतकरी गटाच्या विनंतीस मान देऊन मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. तसेच गावातील प्रशासकीय आयुक्त पदावरती असणारे विजय चौधरी यांनी या नदीच्या खोलीकरणासाठी लागेल तेवढे डिझेल पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली.

यावेळी लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, तंटामुक्त अध्यक्ष निंबा बापू चौधरी, पुरुषोत्तम लोटन चौधरी, रवींद्र एकनाथ पाटील,जयवंत पाटील, भैय्या सुखदेव पाटील, पाणी फाउंडेशनचे सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने काम सुरू करण्यात आले होते.


