
देशासाठी बलिदान गेल्यास भाग्यवान समजू…
अमळनेर : भारत मातेच्या संरणक्षणासाठी बलिदान द्यायला तयार आहोत म्हणत माजी सैनिक सीमेवर जाण्यासाठी उत्सुक झाले आहेत. माजी सैनिकांच्या सोशल मिडियावरच्या संदेशाने तरुणांमध्ये माजी सैनिकांमध्ये नवी स्फूर्ती निर्माण झाली आहे.

भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले आहे. भारत सरकारने आम्हाला बोलावल्यास आमची सीमेवर जायची तयारी आहे. आम्ही पेन्शन घेतो ,आम्हाला अनुभव आहे. आम्ही देशासाठी बलिदान द्यायला तयार आहोत. देशासाठी मेलो तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजू असे म्हणत खान्देश रक्षक फौंडेशनचे धनराज रामदास पाटील यांनी आपल्या ग्रुपवर मेसेज टाकून देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर असल्याचे दाखवून दिले आहेत. अमळनेर तालुक्यात खान्देश रक्षक फौंडेशन , माजी सैनिक संघ असे ग्रुप सक्रिय आहेत. २०१७ पासून तर २०२५ पर्यंत निवृत्त झालेल्या सैनिकांनी तयारीत रहावे असेही संदेश सोशल मिडीयावर फिरत असून देशभक्तीचा जागर केला जात आहे.

युद्ध आणखी वाढल्यास रक्ताची देखील गरज भासू शकते म्हणून रक्तदान करा ,देशाच्या कामी या असे आवाहनही केले जात आहे. पाकिस्तानशी सुरू झालेल्या युद्धामुळे भीती ऐवजी नागरिकांत जोश निर्माण झाला आहे.


