
ग्रामसेवकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक करून केला गुन्हा दाखल…
अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पारोळा तालुक्यातील ग्रामसेवकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील ग्रामसेवक दिनेश वासुदेव साळुंखे यांनी लोकेश अविनाश पवार या ठेकेदाराकडून रस्त्याच्या ४ लाख रुपये बिल काढल्याच्या मोबदल्यात १० टक्के म्हणजे ४० हजार रुपये कमिशन मागितले. त्यावेळी साळुंखे यांनी त्यांना अमळनेर येथे बोलावले.दरम्यान अविनाश याने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्याकडे तक्रार दिली होती.

लोकेश पवार यांच्याकडे पावडर लावलेल्या नोटा पोलिसांनी देऊन ठेवल्या होत्या. आरोपी दिनेश साळुंखे याने लोकेश पवार ,त्याचे काका अनिल पवार आणि पंच याना सुभाष चौकात चहा पाजला आणि तेथून ग्रामसेवकाने लोकेश ला मोटरसायकलवर बसवून दगडी दरवाज्यासमोर जाऊन मोटरसायकल च्या पायदानावर पैसे ठेवायला लावले. लोकेशने लाचलुचपत विभागाला इशारा केला परंतु त्याठिकाणी गर्दी असल्याने संबंधित ग्रामसेवक वाहनाने पळून गेला. लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता धुळे रस्त्यावर कोमल गार्डन शेजारी पथकाने पकडून त्याच्याकडून रक्कम जप्त करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली खांडवी , हेडकॉन्स्टेबल राजन कदम , प्रशांत बागुल , यांनी ही कारवाई केली आहे. तपास रुपाली खांडवी करीत आहेत. आरोपीला जळगाव न्यायालयात हजर केले असता आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

