
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे शिवारात बाजूच्या शेतात लागलेली आग आजुबाजूला पसरल्याने एकाच्या शेतात असलेली ज्वारी व चारा खाक झाला आहे.
याबाबत मारवड पोलिसांत ज्ञानेश्वर एकनाथ बडगुजर (राहणार मारवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे कळमसरे शिवारात पाच बिघे शेत असून त्यात ज्वारीचे पीक लावले होते. व ते काढणीसाठी कापून शेतात ढीग करून ठेवले होते. व त्यातून शंभर क्विंटल ज्वारी येणे अपेक्षित होते. मात्र ११ एप्रिल रोजी बाजूच्या शेतात अज्ञात व्यक्तीने लावलेली आग ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या शेतात पोहचल्याने ज्वारीची गंजी खाक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास शंभर क्विंटल ज्वारी, चारा, व शेती साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात येऊन सदर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.