
डोळ्यावर पट्टी बांधलेल्या प्रशासनाच्या तोंडात अर्थपूर्ण बोळा कोंबला आहे का ? नागरिकांचा सवाल…
अमळनेर:- तालुक्यातील जळोद परिसरात तापी नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून रात्री हजारो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीकडे प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत असून खालपासून वरपर्यंत सर्वांनीच चुप्पी साधली आहे.
गेल्या काही दिवसापासून जळोद परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधान आले आहे. कोणालाही न जुमानता रात्री जेसीबी नदी पात्रात उतरवून माफियांकडून डंपरने हजारो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असला तरी अधिकाऱ्यांनी गांधारीसारखी पट्टी डोळ्यावर बांधल्याने वाळू तस्करांना मोकळे रान मिळाले आहे.

तापी नदी पात्रात या माफियांनी वाळूचे ढीग करून ठेवले आहेत. यंत्रणेचे कर्मचारी दिवसभर वाळू माफी यांच्या सहवासात असल्याचे लपून राहिलेले नाही. जळोद अमळगाव मार्गे शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे विशेष म्हणजे वाळू वाहतूक करणारे राजरोसपणे डंपर आणि जेसीबीचा वापर करत आहेत. गाव-खेड्यांमधून असलेल्या मुख्य रस्त्यावर डंपर भरधाव व सुसाट वेगात सुरू आहेत. वाळू तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पुरती वाट लागत आहे. वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणेने चुप्पी साधल्याने प्रशासनाच्या तोंडांत अर्थपूर्ण बोळा कोंबला आहे का ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. स्थानिक प्रशासन वाळू माफियांच्या ताब्यात गेल्याने पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या तस्करांना आता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आवर घालावा अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
टेम्पोसुद्धा पकडणाऱ्या भरारी पथकांना डंपर दिसेनासे झाले-
वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीला ही पथके ग्रामीण भागात रात्री अपरात्री फिरून ट्रॅक्टर वर लक्ष ठेवत होती. व काही ठिकाणी कारवाई ही करत होती. वाळूच्या टेम्पोवर ही कारवाई करणाऱ्या या पथकाला मात्र जळोद येथून वाळू वाहतूक करणारे डंपर दिसेनासे झाले असून या पथकाने सध्या वाळू माफियांनी भेट दिलेला चष्मा घातला आहे की काय ? असा सवाल विचारला जात आहे.

