
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे गावठी दारू विकणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करत अंतुर्ली येथे सट्टा घेणाऱ्या इसमावर छापा टाकून मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारवड येथे माळन नदीकाठी झाडाझुडुपाच्या आडोश्याला मार्तंड नारायण चव्हाण हा गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्याकडे ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. त्याच्यावर दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच अंतुर्ली येथे सट्टा मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांनी छापा टाकला असता प्रवीण हिंमत भील (वय २६) हा कल्याण नावाचा सट्टयाचे आकडे व पैसे स्वीकारताना आढळून आला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्याचा तपास हेकॉ सुनील अगोने हे करीत आहेत.

