अमळनेर : एक वर्षांपूर्वी आपल्याच कर्मचाऱ्यांच्या आश्वसित प्रगती योजनेचा हप्ता व वेतन निश्चिती साठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
पाणी पुरवठा कर्मचारी गणेश शिंगारे याच्या सुधारित आश्वसित योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नव्हता तसेच वेतन निश्चिती झाली नव्हती म्हणून त्यांनी मनोज साहेबराव निकुंभ या कर्मचाऱ्यांची भेट घेतली असता त्याने मला दोन हजार रुपये द्या मी मुख्याधिकारीकडून सर्व मंजूर करून आणतो असे सांगितले. याबाबत शिंगारे यांनी २१ ऑक्टोबर २०२४ रोजी जळगाव लचुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे , पो कॉ बाळू मराठे , प्रणेश ठाकूर यांनी सापळा रचला. मात्र मनोज निकुंभ यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र रेकॉर्डर मध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. कारवाई स्थगित झाली होती. याबाबत एसीबी ने गणेश शिंगारे यांच्याशी वारंवार कारवाईबाबत संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. अखेरीस ३० नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळण्याचा अहवाल पाठवला होता. त्यावर ५ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिल्यावर मनोज निकुंभ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत.
मनोज निकम याना अमळनेर न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला. न्या एल डी गायकवाड यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

