
प्रत्येकवेळी विदयार्थी संख्येएवढ्या प्रश्नपत्रिका देण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी नियोजनात गोंधळ….
अमळनेर : शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणी साठी तालुक्यात मराठी आणि उर्दू माध्यम मिळून सुमारे १७४६ प्रश्नपत्रिका कमी आल्या आहेत. प्रत्येकवेळी शासन विदयार्थी संख्येएव्हढ्या प्रश्नपत्रिका देण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी नियोजनात गोंधळ करीत असते. संपूर्ण महराष्ट्रभर हेच चित्र दिसून येत आहे.
शासन दरवर्षी इयत्ता २ री ते ८ वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी , इंग्रजी , आणि गणित विषयाची पायाभूत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर जाणून घेत असते. यासाठी प्रश्नपत्रिका शासनामार्फत पुरवल्या जातात. पंचायत समितीकडून यु डायस च्या मागील वर्षीच्या संख्येनुसार प्रश्नपत्रिकांची मागणी केली जाते. त्यात किरकोळ प्रमाणात विद्यार्थी पट संख्येत बदल होऊ शकतो. मात्र मागणी केलेल्या प्रश्नपत्रिका संचापेक्षा कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका ऐनवेळी प्राप्त झाल्यानंतर कमी प्रश्नपत्रिकावर परीक्षा कशा घ्याव्यात असा प्रश्न पडतो. आणि आधी प्रश्नपत्रिका ओपन करून झेरॉक्स केल्या तर गोपनीयतेचा भंग होतो. एक प्रश्नपत्रिका सुमारे दहा पानांची असते. आणि सर्वच शाळेत झेरॉक्स मशीन नसल्याने दहा पाने झेरॉक्स करण्यासाठी किमान दहा ते १५ रुपये लागतात. ते कोणी करावेत असा प्रश्न निर्माण होतो. प्रश्नपत्रिका खराब झाल्यास फाटल्यास जादा उपलब्ध असल्या पाहिजेत मात्र त्या नेहमीच कमी भरतात.
अमळनेर तालुक्यात मराठी माध्यमाच्या २५ हजार ७७२ तर उर्दू माध्यमाच्या १ हजार ६०८ प्रश्नपत्रिका २०२४-२५ च्या युडायस संख्येनुसार मागवण्यात आल्या होत्या. पैकी मराठी माध्यमाच्या २४ हजार १२६ आणि उर्दू माध्यमाच्या १ हजार ५०८ प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. एकूण १ हजार ७४६ प्रश्नपत्रिका पंचायत समितीला कमी प्राप्त झाल्या आहेत. शाळा पातळीवर आणखी कमी पडू शकतात.याही व्यतिरिक्त शाळेतील विदयर्थ्यांमध्ये तफावत आढळून येते त्यामुळे आणखी अडचण प्राप्त होते. ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान मराठी , इंग्रजी आणि गणित विषयांच्या परीक्षा सुरू होत आहेत.
आमच्याकडे २०२४-२५ च्या युडायस प्रमाणे प्रश्नपत्रिका मागणी होते. मात्र वरूनच प्रश्नपत्रिका कमी प्राप्त झाल्या तर समान तत्वावर त्या वाटप केल्या जातात. जेथे अपूर्ण पडतात तेथे झेरॉक्स करायला सांगितले जाते.- रावसाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर
प्रश्नपत्रिका कमी येणे हा नेहमीचा प्रकार झाला आहे. शासनाने पटसंख्या मागवून संख्येपेक्षा किमान चार पाच प्रश्नपत्रिका जास्त पाठवाव्यात - विनोद कदम, मुख्याध्यापक जी एस हायस्कूल अमळनेर

