
अमळनेर – खान्देशातील महत्वाचा मुख्य सण म्हणून ओळख असलेला ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव तालुक्यातील मारवड पंचक्रोशीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस गावात कामानिमित्त बाहेर गावी गेलेले गावागावातील भाऊबंदकीतील लोक परिवारासह गावात दाखल झाल्याने गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या कानबाई उत्सवासाठी तीन दिवस महिला व नागरिकांकडून लगबग व जोडपीच्या जोडपी कानबाई पुजनासाठी रांगा लावून दर्शन घेत निघत होत्या. कानबाईची भजन व गायनाचा कार्यक्रम काल रात्रभर होऊन कानबाई जवळ प्रत्येक भाऊबंदकितील महिला व पुरुषांनी गाऊन संगीत तालावर नाचगाने करून नतमस्तक होत जागरण केले. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सकाळीच 7 वाजे पासुन कानबाई विसर्जन तयारीची लगबग दिसत होती. महिला व मुलींनी आपापला खान्देशी पारंपारिक वेषात कानबाईचे जोडप्यांनी पुजन करून प्रसाद वाहुन पारंपरिक सवाद्य विसर्जन मिरवणूकीस सुरूवात केली. गावातील घराघरातून सुवासिनींकडून कानबाई मातेचे पुजन करण्यात केले. चौकाचौकात भजनी मंडळ, डफ व ढोल ताश्याचा गजरात गावकरी कानबाईच्या गाण्यावर व संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचत होते. शेवटी सर्व गावकऱ्यांनी आरती करून “कानबाई माता कि जय” म्हणत विसर्जन करण्यात आले.
कळमसरे येथेही जल्लोषात निरोप..
कळमसरे गावातील संताजी चौक, महाराणा प्रताप चौक, संत सावता माळी चौक, संत गोरोबा काका चौक, संत मीराबाई चौक, दुर्गानगर चौक, महादेव नगर न्यू प्लॉट भागात कानबाई मातेच्या विसर्जन प्रसंगी स्वागत करीत गहू व नारळाची ओटी भरून आरती करण्यात आल्या.
महादेव नगर भागातील नवसाचा गणपती व महादेव मंदिरावर कानबाईला विश्रांती देऊन सर्व गावकर्यांनी आरती करून विसर्जन करण्यात आले. यावेळेस महिला वर्ग भावविवश झालेल्या दिसल्या.
अमळगावात ३० वर्षांनंतर महाले कुटुंबात देवीचे आगमन
अमळगाव येथे शनिवारी (२ ऑगस्ट) घराघरांत रोट पूजन पार पडले आणि महिलावर्गाने पारंपरिक विधींनी मातेची ओटी भरली. यावर्षीची एक विशेष भावनिक बाब म्हणजे, अमळगाव येथील महाले कुटुंबात तब्बल ३० वर्षांनंतर कानबाई मातेची स्थापना व रोट पूजन झाले. पूर्वी सतत सुतक वा अडचणीमुळे पूजन बंद होते, मात्र यावर्षी संधी मिळाल्याने कुटुंबासह संपूर्ण परिसरातील ग्रामस्थ उत्साहित झाले.
रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी मातेची विधिपूर्वक स्थापना व महाआरती पार पडली. गावातील चाकरमानी नागरिकही या उत्सवासाठी गावात दाखल झाले होते, त्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले. बहादुरपूर येथील मूळ पूजक कुटुंबास सुतक व अडचणी आल्यामुळे, देवी ‘पाहुनिन’ (अहिराणी संज्ञेनुसार) म्हणून अमळगावातील सौ. ललिताबाई व बहादूर चौधरी यांच्या घरी पूजेसाठी बसवण्यात आली. सोमवारी (४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, महिलांच्या ओवाळणी व युवकांच्या घोषणांसह गावातून सवाद्यपणे निघाली.
हा उत्सव अमळगावसह मेहरगाव, निंभोरा, कलाली, दोधवद, हिंगोणे, जळोद, पिंगळवाडे, गांधली, पिळोदे, पिंपळी, खवशी आदी गावांसह तालुक्याभरात मोठ्या श्रद्धेने साजरा झाला.

