
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे तालुक्याचे भूमिपुत्र संदिपकुमार साळुंखे आयकर आयुक्त यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
संदिपकुमार साळुंखे हे मारवड येथील रहिवाशी असून ते सध्या नागपूर येथे कार्यरत आहेत त्यांना राष्ट्रीय पातळीवर भारत सरकारकडून सर्वोत्तम सेवा पदक देऊन गौरविण्यात आले होते.त्यानिमित्ताने पिंपळे खुर्द येथील माजी सरपंच दिनेश पाटील यांनी संपूर्ण साळुंखे परिवाराला आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. यावेळेस संदीपकुमार साळुंखे यांना गाडीत बसवून वाजत गाजत गावात मिरवणूक काढून स्वागत केले यावेळेस त्यांच्या सोबत केशव प्रतिष्ठानचे संचालक अनिल भोकरे, भोईटे, आदित्य साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री साळुंखे यांनी आयकर विभागात पारदर्शक आणि कार्यक्षम कार्यातून अनेक नवकल्पना राबवून प्रशासनात उत्कृष्ट सेवा मूल्यांचे उदाहरण घालून दिले आहे.
पिंपळे गावात धरती माता महिला शेतकरी गटाने लोकसहभागातून जलसंधारणाची ठिणगी टाकली आहे त्यांतदेखील संदिपकुमार साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य आहे. साळुंखे यांनी पिंपळे खुर्द गावातील जलसंधारणाच्या कामासाठी तब्ब्ल अडीच लाख रुपये डिझेल स्वरूपात मदत केली होती तसेच श्री गुरुदेव दत्त अभ्यासिकेसाठी टीव्ही पुस्तक, कपाट देणगी स्वरूपात जाहीर केली तसेच त्यांच्या धर्मपत्नी मोनाली साळुंखे यांनी देखील तरुणांना स्पर्धा परीक्षाचे त्यांच्या क्लासच्या लिंक मोफत उपलब्ध करून दिल्या आणि काही महत्वाची पुस्तक देखील अभ्यासिकेला उपलब्ध करून दिले.
या कार्यक्रमात प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील जयवंतराव पाटील पुरुषोत्तम चौधरी बाळू पाटील भैय्या सुखदेव पाटील, सर्व ग्रामस्थ, शेतकरी, तरुण मित्र मैत्रिणी, बचतगटाच्या महिला यांनी मोलाचे सहकार्य केले. दिनेश पाटील यांनी गावाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले त्यांचे देखील सर्व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

