अमळनेर : तालुक्यातील सात्री येथील पाटचारीच्या अतिक्रमित जागेवर भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन द्यावी किंवा वृक्षलागवड करून ऑक्सिजन पार्क उभारण्यात यावा अशी मागणी सुमारे १५० ग्रामस्थांनी सरपंचांकडे केली आहे.

सात्री गावाला रस्ताच नसल्याने पर्यायी रस्ता गिरणा पाटबंधारेच्या पाटचारीच्या जागेतून देण्याचे नियोजित आहे. या बाबत टेंडर प्रक्रिया होऊन आदेशही देण्यात आले होते. मात्र त्या जागेवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण प्रशासनाकडून हटवले जात नाही. आणि गावात रस्त्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. दोन गटात आपसात पोलिसात तक्रारी देखील आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्ता न झाल्यास पुन्हा येरे माझ्या मागल्या परिस्थिती निर्माण होईल. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावाला रस्ता उपलब्ध करून देण्यास एकही राजकीय नेता अथवा अधिकारी यशस्वी झालेला नाही.
ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की , १९७१ मध्ये शासनाने जमीन संपादित करून पाटचारी निर्माण केली होती. त्याचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात आला होता. कालांतराने शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेल झाल्याने पाण्याची मागणी बंद झाली. परिणामी पाटचारी बंद झाली आणि शेतकऱ्यांनी बेकायदेशीर रित्या पाटचारी नष्ट करून अतिक्रमण केले. त्यावर शेती करून उत्पन्न घेणे सुरू केले आहे. शासन रस्ताही करत नाही ,अतिक्रमण ही काढत नाही. शेतकऱ्यांनी ही अतिक्रमित जमीन भूमिहीन शेतमजुरांना शासकीय योजनेमार्फत द्यावी किंवा या जमिनीचा लिलाव करावा जेणेकरून शासनाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. किंवा पर्यावरणवादी विचार करून या जमिनीवर वृक्षलागवड करून ऑक्सिजन पार्क उभारा यासाठी आम्ही श्रमदान करायला तयार आहोत अशी मागणी करण्यात आली आहे.विविध गट मिळून सुमारे ६ हेक्टर ५४ आर जमीन आहे. निवेदनावर राजेंद्र ठाकरे ,सीमा ठाकरे , श्रीराम भिल ,आसाराम भिल ,भागवत भिल ,अजय भिल ,ललिता भिल ,रेखाबाई भिल , तिरोनाबाई भिल ,शोभाबाई बोरसे , सुभाष बोरसे ,ज्ञानेश्वर पाटील, भारती पाटील ,गंगुबाई पाटील , राकेश बोरसे ,उद्धव पाटील ,रामचंद्र पाटील यांच्यासह सुमारे १२२ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

