
संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी प्रवास करून दाखवण्याचे आवाहन
अमळनेर :- तालुक्यातील कळमसरे ते शहापूर रस्त्याचे पूर्णता तीन तेरा वाजले असताना या रस्त्याकडे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी गेल्या तीन वर्षात ढुंकूनही पाहिले नसल्याने रस्त्याच्या दोन्हीही बाजूला काटेरी झुडपे वाढले आहेत. या रस्त्यावरून सिंगल वाहन चालविणे कठीण झाले आहे.
कळमसरे ते शहापूर या पाच किलोमीटर रस्त्याचे काम टप्या-टप्प्याने होत असल्याने हा रस्ता दुर्लक्षित झाला आहे. या रस्त्यावर कळमसरे पासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्हीही बाजूला काटेरी झूडपांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता पूर्णता झाकोळला गेला आहे. दिवसेंदिवस हा रस्ता काटेरी झूडपांच्या विळख्यात आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काटेरी झूडपांच्या वाढलेल्या अतिक्रमणाने वाहन चालविणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या मध्यभागी काटेरी झुडपे आल्याने पुढे रस्ता आहे की नाही,हेच समजत नाही. गेल्या वर्षातच या रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली असल्याने जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे पाहायला तयार नाही. गावाकडून एक किलोमीटर रस्ता तयार केला गेला त्यानंतर दोन किलोमीटर करण्यात आला. मात्र शहापूर ते कळमसरे एकूण पाच किलोमीटर अंतर या रस्त्याचे असून एकही वेळा हा रस्ता एकाच टप्प्यात तयार करण्यात आला नाही. पूर्वी झालेले कामात आजही मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून दिवसातून चार वेळा धावणारी एस टी वाहन बंद पडले आहे. रस्त्याचे काम तर काही या तीन वर्षात झाले नाही. मात्र हा रस्ता शेत रस्ता म्हणून उरला असल्याची प्रचिती शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. काटेरी झुडपे तात्काळ काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
कळमसरे -शहापूर रस्त्याच्या या पाच किलोमीटर अंतरावरून कळमसरे गावापासून शहापूर गावापर्यंत तालुक्यातील खासदार, आमदार, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी प्रवास करून दाखवावा आम्ही त्यांचा गाव पातळीवर जाहीर सत्कार करू असाही मानस परिसरातील लोकांनी ठेवला असून लोकप्रतिनिधी यांनी आपल्या महागड्या गाड्यांनी प्रवास करून प्रत्यक्ष समस्या समजून घ्यावी असेही आवाहन लोकप्रतिनिधी यांना करण्यात आले आहे. तर काही लोकप्रतिनिधीनी ग्रामपंचायत पातळीवर काटेरी झूडपे काढल्याचा सल्ला दिल्यानेही संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्यावरून जाताना एकटा व्यक्ती प्रवास करताना भीती निर्माण होईल अशी परिस्थिती झाली असून मोटार सायकल स्वार ऐवजी कोणतेच वाहन जाणार नाही. मात्र काटेरी झूडपे काढले गेल्याने शेतकऱ्यांना निदान गाडी बैल तरी नेता येईल अशीही मागणी होत आहे.

