
जि. प. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणार…
अमळनेर:- तालुक्यातील जिप शिक्षिका जयश्री पवार पाटील यांनी सोनी मराठी वाहिनीवर आयोजित ‘कोण होणार करोडपती’ या काल रात्री संपन्न झालेल्या कार्यक्रमात विविध प्रश्नांची उत्तरे देऊन साडेबारा लाख रुपये जिंकले असून शाळेतील हुशार असून आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे अशक्य आहे अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करणार आहे अशी प्रतिक्रिया रक्कम जिंकल्यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी बोलतांना व्यक्त केली.
या कार्यक्रमात जयश्री ताईंनी साने गुरुजी, बहिणाबाई, बाबा आमटे, नरेंद्र दाभोलकर, शिक्षण महर्षि नानासाहेब झेड.बी. पाटील यांचा चर्चेत आवर्जुन उल्लेख केला. हा कार्यक्रम संपल्यावर सर्वत्र जयश्रींचे कौतुक व अभिनंदन करणारे संदेश समाजमाध्यमांवर झळकले.अनेकांनी दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले. सौ. जयश्री पवार या जयहिंद हायस्कुलचे निवृत्त आदर्श शिक्षक व युवक क्रांती दलाचे साथी दिलीप पवार सर (हुंबर्डेकर) यांच्या कन्या असून अमळगाव येथील प्रगतीशील शेतकरी स्व. आर. आर. पाटील यांच्या सून , नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिवद ता. अमळनेर येथील प्राध्यापक संदीप रघुनाथ पाटील (अमळगावकर) यांच्या त्या पत्नी आहेत. तर पुणे येथील नादमुद्रा ग्रृपचे संचालक प्रसिद्ध गायक धनंजय पवार यांच्या त्या भगिनी आहेत. सौ. जयश्री पवार पाटील या धुळे जयहिंद शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून अमळनेर तालुक्यातील जळोद जि.प. शाळेत शिक्षिका आहेत.धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्र सेवा दल सैनिक गो.पि. लांडगे यांनी अमळनेर येथे जाऊन त्यांचा सत्कार केला. त्यांच्या या सुयशाबद्दल माजी कुलगुरु अण्णासाहेब के. बी. पाटील, जयहिंदचे चेअरमन डॉ. अरुण साळुंके, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, प्राचार्य पी.एच. पवार, अमळनेर गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी, आर.डी. महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. धनगर अण्णा, मुख्याध्यापक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रक़ाश पाटील, माजी सभापती उदय नंदकिशोर पाटील, गिरीश सोनजी पाटील, ॲड. सारांश सोनार, जयवंतराव गुलाबराव पाटील, धनंजय सोनार आदींनी गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या जयश्रींच्या ‘दानी’ वृत्तीबद्दल अभिनंदन व कौतुक केले.







