
एक वर्षांपूर्वीचा युरिया आढळून आल्याने संबंधित व्यापाऱ्याचे गोदाम केले सील
अमळनेर : बेकायदेशीर खतांचा साठा करणाऱ्या खत व्यापाऱ्यांच्या गोदामांची कृषी विभागाने अचानक छापे मारून तपासणी केली असता गोदामात एक वर्षांपूर्वीचा कडक युरिया आढळून आला. संबंधित व्यापाऱ्याचे गोदाम सील करण्यात आले आहे.

कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के , जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे , तालुका स्तरीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सचिन वानखेडे , एरंडोल तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक निखिल तोळकर यांनी प्राप्त तक्रारीनुसार शहरात दोन तीन खतांचे गोदाम तपासले. त्यात मुंबई गल्लीत संजय जैन नामक व्यापाऱ्याच्या गोदामाजवळ अधिकारी वर्ग गेला असता सुरुवातीला व्यापाऱ्याने हे माझे गोदाम नाही असे दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र घर मालकाने जेव्हा कबुली दिली तेव्हा व्यापाऱ्याने गोदाम असल्याचे मान्य केले. गोदामांची तपासणी केली असता सप्टेंबर २०२५ चा युरिया आढळून आला. हा युरिया कडक झालेला दिसून आला. व्यापारी आपला माल नियोजित गोदामातून इतरत्र हलवून खतांची कृत्रिम टंचाई करून जादा भावाने विक्री करतात. अनेकदा कालबाह्य झालेला साठा ,खराब झालेला माल देखील शेतकऱ्यांना जादा भावाने विक्री करून फसवले जाते अशी ओरड होती. या गोदामात माल सुरक्षित नव्हता वरून पाणी आत मध्ये शिरलेले होते. कृषी नियमाचे उल्लंघन झालेले प्रथम दर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे गोदामाला सील लावण्यात आले असून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली.




