
अमळनेर : स्वातंत्र्याच्या संग्रामात मोलाची आणि ठळक भूमिका निभावणारे अमळनेरचे क्रांतिवीर डॉ उत्तमराव पाटील आणि क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील यांच्या कार्याला उजाळा देणारे ढेकू रोड वरील क्रांतीपर्व स्मारक झाकोळले गेले आहे. उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिल्पावर धूळ बसून क्रांतिकारकांचा अपमान होत आहे.

ढेकू रोडवर माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्या प्रयत्नांतून डॉ उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील या क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी अर्धाकृती पुतळे आणि भिंतींवर त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील लढ्याचे स्फूर्तिदायक प्रसंग. सानेगुरुजीचा प्रसंग , चिमठाणे येथे इंग्रजांचा खजिना डॉ उत्तमराव पाटील व इतर क्रांतिकारकांनी लुटला होता तो प्रसंग आणि अमळनेरचे कॅप्टन मल्हारराव चिकाटे , सैतान माळी यांचेही स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंग भिंतीवरील शिल्पात साकारण्यात आले आहेत. हे स्मारक भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अमळनेरचे क्रांतीपर्व जनतेसमोर मांडणार आहे. भावी पिढीसाठी ते निश्चित उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
निव्वळ उदघाटनाअभावी शिल्प धूळ खात पडले आहे तर पुतळे झाकले आहेत. आचारसंहितेचे कारण सांगून उदघाटन लांबले मात्र आचारसंहिता संपून नवीन सरकार स्थापन झाले. प्रलंबित कामे सुरू झाले पण क्रांतिकारकांच्या स्मारकाचे उदघाटन का होत नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
प्रतिक्रिया…
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ७१ लाख रुपयात हे काम करण्यात आले असून लवकरच कोणाच्या हस्ते उदघाटन करावे हे ठरवून तारीख घेऊन निश्चित केले जाईल- श्याम पाटील, माजी नगरसेवक ढेकू रोड अमळनेर

