
अमळनेर:-शहरात भरधाव वेगाने जाणाऱ्या रेतीच्या डंपरने धडक दिल्याने जखमी झालेल्या 65 वर्षीय वृद्धाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दिनांक 13 रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

सदर प्रकरणी डंपरचालक रोशन शंकर खराटे, रा.लोहनेर, ता. देवळा, जिल्हा नाशिक याचेवर वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरुद्दीन शेख अब्दुल,वय 65 रा.जोशीपुरा, पिंपळे रोड,अमळनेर असे मयत इसमाचे नाव असून सदर घटना दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता धुळे रोडवरील डॉ.किरण बडगुजर यांच्या श्री दत्त हॉस्पिटलसमोर घडली होती.या घटनेत डंपर क्रमांक एम एच 41,बी टी 2021 वरील चालक रोशन खराटे याने आपले वाहन हयगयीने,बेदरकारपणे, रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून चालवून पायी चालत असलेले शेख अब्दुल यांना जोरदार धडक दिली होती.यात शेख यांना गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरून उचलत रिक्षात टाकून उपचारासाठी त्यांना अमळनेर शहरातील डॉ.सुमित सूर्यवंशी यांच्या श्री एक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचार करीत असताना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
सदर प्रकरणी महेमूदखान मजीदखान पठाण,रा जोशींपुरा यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक रोशन खराटे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहेत.




