
दररोज सकाळी खेळाडूना राबवावे लागते स्वच्छता अभियान
अमळनेर:-येथील मारवड रस्त्यावरील शासकीय क्रीडा संकुल दररोज रात्री दारुड्यांचा अड्डा बनत असून सदर दारुडे मद्यधुंद होऊन खाली बाटल्या व खाद्य पदार्थांचे रॅपर तिथून सोडून जात असल्याने दररोज पहाटे व्यायाम किंवा खेळासाठी येणाऱ्या खेळाडूना स्वच्छता अभियान राबवावे लागत असते.

दररोज युवक व युवती सकाळ संध्याकाळ याठिकाणी रनिंग अथवा व्यायाम करण्यासाठी येत असतात, अनेक खेळ देखील याठिकाणी खेळले जात असतात मात्र एकप्रकारे शारीरिक दृष्ट्या पवित्र असलेल्या या क्रीडा संकुलास काही भामटे रात्रीच्या वेळी दारूचा अड्डा करीत असल्याने विद्यार्थी व खेळाडू मध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत.या दारुड्यांना आवर घालणार कोण असा प्रश्न अनेकांना पडला असून पोलीस प्रशासनाने अधून मधून रात्रीच्या वेळी याठिकाणी राऊंड केल्यास निश्चितच या दारुड्यांना कुठेतरी चपराक बसणार आहे.अन्यथा कुणाचाही धाक नसल्यास दिवसेंदिवस दारुड्यांची संख्या अधिक वाढून हे क्रीडा संकुल दारुड्यांचा कायमचा अड्डा झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती अनेक खेळाडूंनी व्यक्त केली आहे.सदर क्रीडा संकुल गावाबाहेर व निर्जन स्थळ असल्याने दारूच्या नशेत काही वादविवाद झालेत तर काही विपरीत घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही यामुळे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे अशी मागणी खेळाडू व व्यायाम पटूंनी केली आहे.




