
बेलापूरकर महाराजांच्या दिंडीचे आज होणार आगमन,उद्या 27 रोजी रथोत्सव
अमळनेर-गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेल्या संत सखाराम महाराजांचा भाविकांनी शांततेत व आनंदात साजरा करावा असे आवाहन वाडी संस्थांनचे गादीपती प पु संत हभप प्रसाद महाराज यांनी पत्रकार परिषदेत भाविकांना आवाहन करताना केले.

यात्रोत्सवात दुकाने व पाळणे थाटण्यास सुरुवात झाली असून पालिकेचे पुरेसे सहकार्य लाभत आहे,यंदा दोन्ही बाजूला पार्किंग असून माजी सैनिकांच्या मदतीने पार्किंग व्यवस्था असणार आहे.याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने संपुर्ण यात्रोत्सवात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.यात्रा सुटसुटीत असल्याने भविकांची गैरसोय होणार नाही तसेच निसर्गाची कृपा राहिल्यास व पालिकेकडून शेवटपर्यंत पाणीपुरवठा होत राहिल्यास जास्ती दिवस यात्रा यंदा राहू शकेल अशी माहिती महाराजांनी दिली.यावेळी पालिकेच्या वतीने उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी भाविकांची वाहने सुरक्षित राहावी यासाठी पे पार्किंग केली असून शक्य झाल्यास दुचाकी वाहनांना फ्री पार्किंग चा प्रयत्न करू व जास्तीजास्त सुविधा पालिकेच्या वतीने देण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही श्री पाटील यांनी दिली.
बेलापूरकर महाराजांचे आज होणार आगमन
वारकरी संप्रदायातील गुरू-शिष्य परंपरेचा अद्वितीय वारसा आजही तितक्याच श्रद्धेने जपला जात असल्याचे बेलापूरकर महाराजांच्या परंपरेतून दिसून येते. गुरुवर्य संत सखाराम महाराजांनी सुरू केलेली नामस्मरण व वारकरी चळवळीची पताका त्यांच्या उत्तराधिकारी संतांमार्फत पुढे चालत राहिली असून, त्याच परंपरेचा वारसा बेलापूरकर महाराज आणि त्यांच्या गादीवरील पुरुष आजही अखंडपणे जोपासत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही वैशाख वारीनिमित्त बेलापूरकर महाराजांचे काल रात्री अमळनेरच्या वेशीवर आगमन होऊन रात्रीचा मुक्काम आर के पटेल फॅक्टरीवर झाला.उद्योगपती विनोदभैय्या पाटील यांनी त्यांचे स्वागत करून मुक्कामाची व्यवस्था केली.आज दिनांक 26 एप्रिल रोजी दशमीच्या दिवशी अमळनेर शहरात त्यांचे आगमन होणार आहे. त्यांच्या आगमनाला भाविकांमध्ये विशेष धार्मिक महत्त्व असून, “पंढरीचा पांडुरंग शहरात दाखल झाला” अशी भावना भक्तांच्या मनात निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या दिंडीला यात्रोत्सवात अनन्यसाधारण स्थान आहे.वाडी संस्थानचे गादी पुरुष प्रसाद महाराज स्वतः शहराच्या वेशीवर जाऊन बेलापूरकर महाराजांचे स्वागत करतात. वारकरी परंपरेतील ही परस्पर सन्मानाची परंपरा विशेष मानली जाते.यात्रोत्सव काळात बोरी नदीच्या वाळवंटातील संत सखाराम महाराजांच्या समाधीसमोर दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत टाळ-मृदुंगाच्या गजरात कीर्तन-भजनाचा पहारा दिला जातो. या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची निर्मिती होते.
बेलापूर (ता. श्रीरामपूर, जि. नगर) येथील मूळ रहिवासी असलेले बेलापूरकर महाराज हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जातात. त्यांनी पंढरपूर येथे संत सखाराम महाराजांकडून अनुग्रह घेतला होता. वर्षातील प्रत्येक महिन्यात ते पांडुरंगाची शुद्धवारी करतात, ही त्यांची विशेष साधना आहे.
यात्रोत्सवात बेलापूरकर महाराजांना लालजी महाराजांच्या रथोत्सवात मानाचे स्थान दिले जाते. तसेच पालखी मिरवणुकीच्या पुढे दिंडी काढण्याचा मान, पौर्णिमेला गुलालाचा पहिला मान आणि काल्याचे कीर्तन करण्याचा मानही त्यांच्या दिंडीला दिला जातो. या विधींनंतर यात्रोत्सवाची सांगता होते.आज 26 एप्रिल रोजी बेलापूरकर महाराजांच्या आगमनाने यात्रोत्सवाची औपचारिक सुरुवात होणार आहे.
27 रोजी रथोत्सव
उद्या 27 एप्रिल मोहिनी एकादशीला रथोत्सव असल्याने अमळनेर शहर पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.रथोत्सवात यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे काळानुरूष होणार बदल होणार असून भविकांसोचत ट्रॅक्टर देखील रथाचा सारथी बनणार आहे. केवळ संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि भाविकांच्या काळजीसाठी वाडी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय गेल्या वर्षीच घेतला होता.भाविकांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले होते.मात्र एवढा बदल वगळता रथोत्सवाची परंपरा जैसेथेच असून रथाचा विविध धर्मीय व विविध समाजांना दिला जाणारा मान, रथाचा मिरवणूक मार्ग,रथाची वेळ, आणि पानसुपारी यात कोणताही बदल झालेला नसल्याने रथोत्सवाची परंपरा जैसेथेच राहणार आहे.सायंकाळी 6 वाजता वाडी संस्थानमध्ये रथाचे विधिवत पूजन होऊन सराफ बाजार,फरशी पूल,पैलाड मार्गे दुसऱ्या दिवशी पहाटे रथ वाडी संस्थानात दाखल होणार आहे.




