
अमळनेर(प्रतिनिधी):- शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या ८० फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळी बसणाऱ्या तळीरामांमुळे त्या रस्त्याला ओपन बारचे स्वरूप आले आहे. पालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शहरातील अंतर्गत दळणवळणाला चालना मिळावी यासाठी शासनाच्या ७० कोटी निधीतून व पालिकेच्या माध्यमातून ८० फुटी (रिंगरोड) रस्ता उभारण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे तर काही भागात रस्ता तांत्रिक अडचणींमुळे रखडला आहे.या रस्त्यामुळे शिंदखेडा रोड,धुळे रोड,पारोळा रोड अमळनेर शहराशी जोडले जाणार आहेत.
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आलेली नसली नागरिकांनी ढेकू रोड ते गलवाडे रस्ता व धुळे रोड ते पिंपळे रस्ता या भागावरील वाहतूक सुरू आहे.सकाळी व सायंकाळी शहराच्या विविध भागातील महिला व पुरुष या रस्त्यावर फिरायला येत असतात.
या रस्त्यावर पालिकेतर्फे अजून पथदिवे उभारण्यात आलेले नाहीत त्यामुळे सर्वत्र अंधार असतो याचाच फायदा हे तळीराम घेत असतात.रात्री ८ ते १२ पर्यंत येथे जणू तळीरामांची जत्रा भरलेली असते.दारू पिऊन झिंगाट झाल्यावर आरडाओरडा करत रस्त्यावरच काचेच्या बाटल्या फोडलेल्या असतात.दारूसोबतच गांजा सेवन करणाऱ्यांची संख्या शहरात लक्षणीय असून सामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे. या रस्त्यावर अनेकदा महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना देखील घडल्या आहेत.
बिअर बार तसेच परमिट रूममध्ये अठरा वर्षांखालील मुलांना बसू दिले जात नाही. त्यामुळे बरेच अल्पवयीन मुले सर्रासपणे बाहेर मोकळ्या जागेवर बसून बिअर, दारू पित असतात. यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे पालकांनी देखील आपला मुलगा विशेषतः रात्री घराबाहेर गेल्यानंतर काय करतोय, याची दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.
शहरातील ज्या ज्या भागात असे प्रकार होत असतील, त्या त्या भागात पोलिसांची गस्त वाढवली जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. सामान्य नागरिकांना व महिलांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिस प्रशासन घेईल. –
दत्तात्रय निकम,
पोलिस निरीक्षक, अमळनेर




