
अमळनेर : तालुक्यात वाढत्या तापमान व ‘एल निनो’ चा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर व प्रशासनाने विविध गावांमधील खासगी विहिरी अधिग्रहित करून त्यागावा करिता टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. एकूण ७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून या विहिरींच्या माध्यमातून संबंधित गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
धुपी येथील भाऊसाहेब लोटन पाटील (गट नं. १८९) यांची गडखांब विहीर, विजय हिरामण पाटील (गट नं. ८४२) यांची मांजर्डी विहीर तसेच मनाज हिरामण पाटील यांची विहीर १६ एप्रिल २०२६ रोजी अधिग्रहित करण्यात आली आहे. या तिन्ही विहिरींद्वारे गावासाठी टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
याचप्रमाणे दहिवद खुर्द येथील गुरुदत्त वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळाची विहीर (गट नं. १९२), जुनोने येथील अमाद इंद्रसिंग राजपूत (गट नं. २१४/१) यांची विहीर तसेच भोरटेक येथील यवराज शेनपडू संदानशिव यांची विहीर १६ एप्रिल २०२६ रोजी अधिग्रहित करण्यात आली आहे.
दरम्यान, पळासदळे येथील विहीर (गट नं. ५५५/१/ख) २७ एप्रिल २०२६ रोजी अधिग्रहित करण्यात आली असून या विहिरीतूनही गावाकरीता टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.शिवाय अमळनेर येथील सिंधी कॉलनी भागातील विहीर देखील रिफीलिंग करून अधिग्रहित करण्यात आली आहे.
प्रशासनाने लोकसंख्येचा विचार करून टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन केले असून पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.याबाबत विहिरी अधिग्रहित करण्या संदर्भात व पुढील काळात अजून प्रस्ताव आल्यास तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी सांगितले.




