
अमळनेर : तालुक्यातील तांदळी येथे हळदीच्या कार्यक्रमादरम्यान बुलेटच्या सायलेंसरचा कर्कश आवाज करण्यावरून दोन गटांत वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या प्रकरणात तिघे जखमी झाले असून एका महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही घटना ३ मे रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तांदळी येथील सुमारे ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा मुलगा हा गावातील भूषण रमेश शिरसाठ यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. ४ मे रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास तो बुलेटवरून घरी परतत असताना राजू गुलाब शिरसाठ, संदीप हरचंद शिरसाठ, सोनत्या बापू शिरसाठ व सौरभ वसंत शिरसाठ यांनी ‘बुलेटचा आवाज का करतोस?’ या कारणावरून त्याला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर मयूरच्या वडिलांनी जाब विचारला असता, संदीप शिरसाठ यांनी अंगणातील वीट उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप पती जखमी झाल्यानंतर संदीप शिरसाठ यांनी घराचा दरवाजा लाथ मारून उघडत संबंधित महिलेची साडी ओढून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या झटापटीत तिची सोन्याची चैन तुटली. तसेच घरासमोरील चारचाकी वाहनावर दगडफेक करून काच फोडण्यात आल्याचेही फियार्दीत म्हटले आहे. दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही प्रत्युत्तरादाखल फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संदीप शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयूर शिरसाठ हा हळदीच्या कार्यक्रमात बुलेटचा मोठा आवाज करीत होता. त्याला याबाबत जाब विचारला असता, मयूरने रघुनाथ पारवे व भूषण पारवे यांना घेऊन येत शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी रघुनाथ पारवे यांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत.




