
नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश, कुटुंबीयांचा अभिमान उंचावला
अमळनेर – तालुक्यातील दहीवद खुर्द येथील डॉ. ऋषिकेश प्रभाकर पाटील यांना मनोविकार (सायकेट्रिक नर्सिंग) या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी) ही पदवी बहाल झाली आहे. ते सध्या जवाहर मेडिकल फाऊंडेशन संचालित ए.सी.पी.एम. कॉलेज ऑफ नर्सिंग येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.

डॉ. पाटील हे डॉ. प्रभाकर सुकदेव पाटील यांचे सुपुत्र असून, डॉ. प्रभाकर पाटील यांनी गेल्या चार दशकांपासून वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवा बजावली आहे. तसेच त्यांची आई या दहीवद खुर्द येथील माजी सरपंच आहेत. या यशाबद्दल कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे कनिष्ठ बंधू डॉ. अविनाश प्रभाकर पाटील यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “माझे मोठे बंधू यांनी नर्सिंग क्षेत्रात पीएच.डी ही उच्च पदवी संपादन करून त्यांच्या नावापुढे ‘डॉ.’ ही मानाची पदवी जोडली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून त्यांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाचा अभिमान उंचावला आहे. त्यांची मेहनत, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठा यांमुळेच त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “हे यश केवळ त्यांचेच नसून आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात ते आणखी प्रगती करत नर्सिंग क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करतील, असा आम्हाला विश्वास आहे.” या प्रसंगी सर्व कुटुंबीय, गावकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून गाव व तालुक्यासाठी मिळालेल्या या यशाबद्दल डॉ. पाटील यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.




